चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील धिंडशी गावातील पांदण रस्त्यांची परिस्थिती अत्यंत खराब असल्याचे समोर आले आहे. या गावातील शेतकरी सुनील वसंता कोरडे यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यात पांदण रस्त्यातील चिखलात त्यांचा बैल रुतल्याचे दिसत आहे. या प्रकारावरून कोरडे यांनी प्रशासन व सरकारवर टीका करत आपली व्यथा मांडली आहे. या व्हिडीओवरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकावर जोरदार टीका केली आहे.
”सरकारला शक्तीपीठ महामार्गासाठी कोट्यवधींचा खर्च करण्याची घाई, पण शेतकऱ्यांच्या पांदण रस्त्यांसाठी पैसा नाही? एकीकडे शेतकऱ्यांच्या जमिनींवर डोळा ठेवून शक्तीपीठ महामार्गासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्याची तयारी सुरू आहे; तर दुसरीकडे शेतात जाण्यासाठीचा साधा पांदण रस्ताही शेतकऱ्यांना उपलब्ध करून देता येत नाही. चंद्रपूरच्या राजुरा तालुक्यातील धीडशी येथे चिखलात बैल रुतल्याची घटना सरकारच्या विकासाच्या दाव्यांची पोलखोल करणारी आहे. मोठ्या प्रकल्पांसाठी कोट्यवधी, पण शेतकऱ्यांच्या मूलभूत सुविधांसाठी निधी नाही? शेतकऱ्यांच्या जमिनी आणि शेतीपेक्षा सरकारला मोठे प्रकल्प महत्त्वाचे आहेत का? आकडे आणि घोषणा नकोत; शेतकऱ्यांना शेतापर्यंत पोहोचण्यासाठी पक्का पांदण रस्ता द्या”, असे वडेट्टीवार यांनी ट्विट केले आहे.