नागपूर : आगामी नागपूर पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या (Nagpur Graduate Constituency Election) पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने (BJP) जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी विदर्भाचा दोन दिवसीय झंझावाती दौरा करत सलग संघटनात्मक बैठकांद्वारे निवडणुकीच्या तयारीला मोठी गती दिली आहे. या दौऱ्यामुळे विदर्भातील भाजप यंत्रणा आणि कार्यकर्ते नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी पूर्ण ताकदीने मैदानात उतरले आहेत.


विदर्भातील विविध संघटनात्मक जिल्ह्यांचा आढावा


दोन दिवसीय दौऱ्यात प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर ग्रामीण (रामटेक), चंद्रपूर महानगर व ग्रामीण, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर महानगर, काटोल आणि वर्धा या सर्व संघटनात्मक जिल्ह्यांच्या आढावा बैठका पार पडल्या. यामध्ये निवडणुकीचे नियोजन, मतदार नोंदणी आणि प्रत्यक्ष कार्यपद्धतीचा आढावा घेत चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना संघटितपणे काम करण्याचे निर्देश दिले.


चंद्रपूर येथील बैठकीत 1980 पासून पक्षकार्यासाठी समर्पित असणाऱ्या ब्रह्मपुरी येथील प्रा. शेख सर यांचा चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. "प्रा. शेख सर यांच्यासारखे निष्ठावंत कार्यकर्ते हे भाजपचे खरे आधारस्तंभ आहेत," असे गौरवोद्गार त्यांनी काढले.


प्रमुख नेत्यांची आणि लोकप्रतिनिधींची उपस्थिती


दौऱ्यादरम्यान रविंद्र चव्हाण यांनी रामटेकचे जिल्हाध्यक्ष आनंदराव राऊत, आमदार कीर्तिकुमार (बंटी) भांगडीया, माजी आमदार अतुल देशकर, किसन नागदेवे, कृष्णा गजभिये आणि विनोद अग्रवाल यांच्या निवासस्थानी व कार्यालयांना भेट देऊन स्थानिक कार्यकर्त्यांशी संवाद साधला.


या दौऱ्यात मंत्री डॉ. अशोक उईके, पालकमंत्री पंकज भोयर, प्रदेश सरचिटणीस आमदार संजय कुटे, आमदार संजय भेंडे, प्रवीण दटके, किशोर जोरगेवार, करण देवतळे, देवराव भोंगळे, परिणय फुके, विजय रहांगडाले, तसेच माजी खासदार हंसराज अहिर व सुनील मेंढे यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते व आमदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.


"नागपूर पदवीधरवर भाजपचाच विजय होणार"


दौऱ्याच्या शेवटी प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात विदर्भात विकासाची गंगा प्रवाहित झाली आहे. नागपूर ही संघाची पुण्यभूमी असून विदर्भ हा भाजपचा भक्कम बालेकिल्ला आहे. या दौऱ्यात कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसला असून, नागपूर पदवीधर मतदारसंघात आमचाच विजय होईल असा पूर्ण विश्वास आहे."


ही बातमी वाचा:


Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.