Independence Day 2026 नवी दिल्ली : भारताचा 80 वा स्वातंत्र्य दिन उद्या संपूर्ण देशभर साजरा केला जाणार आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त देशभरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. 15 ऑगस्ट 1947 ला भारताला स्वातंत्र्य मिळालं आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त देशभर तिरंगा झेंडा फडकावला जातो आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी संघर्ष करणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांचं आणि त्यांच्या कार्याचं स्मरण केलं जातं.
15 ऑगस्ट 1947ला भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा देशासमोर अनेक आव्हानं होतं. फाळणी, गरिबी, मर्यादित संसाधन अशी अनेक आव्हानं होती. तेव्हा भारताची लोकसंख्या आजच्या तुलनेत कमी होती. मात्र, नंतरच्या काळात देशात लोकसंख्या वेगानं वाढली आहे. भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा भारताची लोकसंख्या किती होती, ते जाणून घेऊयात.
भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा लोकसंख्या 34 कोटी म्हणजेच 340 दशलक्ष होती. यानंतर लोकसंख्या वेगानं वाढल्याचं पाहायला मिळतं. 1951 च्या जनगणनेत भारताची लोकसंख्या 36.1 कोटी होती. यानंतर पुढील तीन दशकांमध्ये भारताची लोकसंख्या वेगानं वाढली आणि 1981 मध्ये 68.3 कोटींवर पोहोचली.
1951 ते 1981 मध्ये भारताची लोकसंख्या जवळपास दुप्पट झाली. या काळात जन्मदर अधिक होता. आरोग्य सुविधांची सुधारणा, स्वच्छता आणि दुसऱ्या व्यवस्थांच्या सुधारणांमुळं मृत्यूदर वेगानं कमी झाला. यामुळं लोकसंख्या वाढीचा वेग अधिक राहिला. 1961 ते 1971 मध्ये भारतात लोकसंख्या वाढीचा वेग 24.8 टक्के होता.
1981 नंतर भारतात लोकसंख्या वाढीचा वेग हळू हळू कमी झाला. मात्र, एकूण लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती. 2001 मध्ये भारताची लोकसंख्या 100 कोटी म्हणजेच 1 अब्ज झाली होती. 2011 च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या 121 कोटींवर पोहोचली आहे. या दशकात लोकसंख्या वाढीचा वेग 17.7 टक्के होता.
2026 मध्ये भारताची लोकसंख्या अंदाजे 147.66 कोटी च्या दरम्यान आहे. 1947 ची लोकसंख्या 34 कोटी आणि सध्याची लोकसंख्या याचा विचार केल्यास त्यामध्ये चारपट वाढ झाली आहे. भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असणाऱ्या देशांपैकी एक आहे. जगाच्या लोकसंख्येमध्ये भारताच्या लोकसंख्येची टक्केवारी 17.8 टक्के आहे.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.