म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे काळाचौकीतील जिजामाता नगर येथे महिलांसाठी उभारण्यात येत असलेल्या अठरा मजली वसतिगृहाचे काम अंतिम टप्प्यात आहे. 1527 चौरस मीटर भूखंडावर हे वसतिगृह उभारण्यात आले असून यात 137 खोल्या आहेत. दिवाळी दरम्यान या वसतिगृहाचे लोकार्पण होणार असून यामुळे शिक्षण किंवा रोजगारानिमित्त मुंबईत येणाऱ्या महिलांच्या निवाऱ्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत शिक्षण किंवा रोजगारानिमित्त आलेल्या महिलांना मुंबईत भाडय़ाने घरे शोधण्यासाठी वणवण करावी लागते. अशा महिला आणि विद्यार्थिनींची गैरसोय होऊ नये याकरता म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे 2022 साली काळाचौकी येथील जिजामाता नगर येथे वसतिगृह उभारण्याचे काम सुरू झाले होते. सध्या या वसतिगृहाचे काम अंतिम टप्प्यात आहे. लोकार्पणानंतर हे वसतिगृह चालवण्यासाठी निविदा काढून एखाद्या संस्थेची नियुक्ती केली जाणार आहे. वसतिगृहातील खोल्यांचे दर सर्वसामान्य महिलांना परवडण्याजोगे असतील का, याकडे आता लक्ष लागले आहे.
ताडदेवमध्येही 196 खोल्यांचे वसतिगृह
म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्वसन मंडळामार्फत ताडदेव एम.पी. मिल पंपाऊंड येथेही महिलांसाठी वसतिगृह उभारण्यात येत असून त्याची निविदा प्रक्रिया सध्या सुरू आहे. 23 मजल्यांचे हे वसतिगृह असणार आहे. यात प्रत्येकी 300 चौरस फुटांच्या 196 खोल्या उभारण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे महिलांची गैरसोय होऊ नये म्हणून वसतिगृहाच्या इमारतीमध्येच एटीएम, दवाखाना, मेडिकल, सलून, लॉन्ड्री, योगा, स्विमिंग पूल, मेस यासारख्या सुविधादेखील देण्यात येणार आहेत.