Kalyan Crime News: गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याच्या किरकोळ कारणावरून विद्यार्थ्याला रस्त्यावरून उचलून गोदामात डांबून बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार कल्याण पश्चिम (Kalyan West) येथे समोर आला आहे. या प्रकरणात भाजपचे माजी नगरसेवक अर्जुन भोईर (Arjun Bhoir) यांचा मुलगा मयूर भोईर आणि त्याच्या साथीदारांकडून विद्यार्थ्यांना घेरून मारहाण करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गाडी बाजूला घेण्यास सांगितल्यावरून विद्यार्थ्यांचा काही तरुणांसोबत किरकोळ वाद झाला. त्यानंतर हा वाद वाढला. दरम्यान, हरवलेले पाकीट शोधण्यासाठी विद्यार्थी पुन्हा त्या परिसरात आले असता त्यांच्यावर 15 ते 20 जणांच्या टोळक्याने हल्ला केल्याचा आरोप आहे. या मारहाणीत लाठी, बांबू आणि लोखंडी रॉडचा वापर करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
या हल्ल्यात बिर्ला कॉलेजचा विद्यार्थी अथर्व देशमुख गंभीर जखमी झाला आहे. अथर्वला रस्त्यावरून उचलून नेत गोदामात डांबून मारहाण करण्यात आल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. या मारहाणीत त्याच्या डोक्यासह शरीरावर गंभीर दुखापती झाल्या असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेत आणखी दोन जण जखमी झाल्याची माहिती आहे.
अथर्वला मारहाण होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याचे वडील थेट संबंधित गोदामात धावून गेल्याचे सांगण्यात येत आहे. मुलाला पाहिल्यानंतर कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. या घटनेनंतर अथर्वच्या वडिलांनी भावनिक प्रतिक्रिया देत, "पाच मिनिटे उशीर झाला असता तर माझा मुलगा जिवंत राहिला नसता," अशी प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात (Khadakpada Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, गंभीर जखमी विद्यार्थ्याच्या तक्रारीबाबत कुटुंबीयांकडून प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. विद्यार्थ्याला झालेल्या गंभीर दुखापती आणि घटनेचे गांभीर्य लक्षात घेता आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी कुटुंबीयांकडून करण्यात येत आहे.
कुटुंबीयांनी केलेल्या आरोपांनंतर संबंधित तरुणाचा जबाब नोंदवून गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणात नेमकी घटना कशी घडली, मारहाणीमध्ये कोण-कोण सहभागी होते आणि विद्यार्थ्याला गोदामात नेण्यामागे नेमका उद्देश काय होता, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. दरम्यान, ही घटना 13 ऑगस्ट रोजी घडल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेनंतर गुन्हा दाखल होऊनही अद्याप आरोपींना अटक झालेली नसल्याने जखमी विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. गंभीर मारहाणीच्या प्रकरणात आरोपींवर कारवाई कधी होणार, त्यांना अटक होणार का आणि जखमी विद्यार्थ्याला न्याय मिळणार का, असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत. या घटनेमुळे कल्याण पश्चिम परिसरात खळबळ उडाली असून, किरकोळ कारणावरून झालेला वाद एवढ्या गंभीर मारहाणीपर्यंत कसा पोहोचला, याची चर्चा सुरू आहे.
आणखी वाचा
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.