ग्रामपंचायतींना स्वच्छतेचे धडे देणाऱ्या चिपळूण पंचायत समितीच्या आवारातच मोठ्या प्रमाणात कचरा साचल्याचे दिसून येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पंचायत समितीच्या परिसरात कचऱ्याचा ढीग पडून असून, याकडे सभापती आणि गटविकास अधिकारी यांचे दुर्लक्ष होत असल्याची चर्चा आहे.
पंचायत समितीच्या आवारातील या कचऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिक, पाण्याच्या बाटल्या तसेच पंचायत समितीतील कागदपत्रांचा कचरा दिसून येत आहे. कचरा साचल्याने परिसराच्या स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे कचरा टाकण्यासाठीचे डस्टबिनदेखील अनेक दिवसांपासून जागेवर पडून असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे पंचायत समितीच्या आवारापासून अगदी काही अंतरावरूनच नगरपालिकेची घंटागाडी नियमितपणे जाते. असे असतानाही पंचायत समितीच्या आवारातील कचरा घंटागाडीमध्ये न देता तो परिसरातच साठवून ठेवला जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कचरा व्यवस्थापनाबाबत पंचायत समिती प्रशासनाकडून योग्य नियोजन केले जात नसल्याचा प्रश्न उपस्थित होत आहे.
पंचायत समितीच्या आवारात कचरा टाकण्यासाठी स्वतंत्र खड्ड्याची व्यवस्था असतानाही बाहेरील परिसरात कचरा साचत असल्याने स्वच्छता व्यवस्थापनावर प्रश्न उपस्थित होत आहेत. ग्रामपंचायतींना स्वच्छता राखण्याबाबत मार्गदर्शन करणाऱ्या पंचायत समितीच्या स्वतःच्या आवारातच अशी परिस्थिती निर्माण झाल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.