Sugar Price Hike : साखरेच्या दरात अचानक मोठी वाढ झाल्यामुळं खळबळ उडाली आहे. 50 रुपये किलोनं विकली जाणारी साखऱे डायरेक्ट 70 ते 80 रुपये प्रति किलोवर गेली आहे. यामुळं सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ बसत आहे. सध्या सणासुदीचा काळ आहे आणि अशातच साखरेच्या दरात वाढ होत आहे. दरम्यान, साखरेच्या दरात नेमकी वाढ का होत आहे. इथेनॉल हेच साखरेच्या दरात वाढ होण्याचं कारण आहे का? याबाबतची सविस्तर माहिती सरकारकडून देण्यात आली आहे.
साखरेच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारने सणासुदीच्या काळात उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी आणि दर नियंत्रणात ठेवण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत. सरकारच्या म्हणण्यानुसार, 20 जुलै रोजी साखरेचा सरासरी भाव 48.18 रुपये प्रति किलो होता, जो 20 ऑगस्ट रोजी 55.70 रुपये प्रति किलोपर्यंत वाढला.
दरम्यान, साखर नेमकी का महाग होत आहे? याबाबत सरकारच्या वतीनं स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. इथेनॉलसाठी साखरेचा वापर केल्यामुळं साखरेच्या दरात वाढ झालेली नाही, असे सरकारने स्पष्ट केले आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार, इथेनॉलसाठी वळवण्यात येणाऱ्या साखरेचा वाटा 2022-23 मधील सुमारे 12 टक्क्यांवरुन 2025-26 मध्ये सुमारे 9 टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे. यावर्षी साखरेचे उत्पादनही अपेक्षेपेक्षा कमी होण्याची शक्यता आहे. राज्यांनी सुरुवातीला सुमारे 34.3 दशलक्ष टन उत्पादनाचा अंदाज वर्तवला होता, परंतु आता उत्पादन सुमारे 30.6 दशलक्ष टन होण्याचा अंदाज आहे.
दरम्यान, हवामान बदलाचा ऊस पिकाला मोठा फटका बसला आहे. ऊस पिकाचे लाल कुजवा आणि खोडकिडा या रोगांमुळे, तसेच अतिवृष्टी आणि पाणी साचल्यामुळे नुकसान झाले आहे. याचबरोबर सणासुदीच्या काळात साखरेच्या मागणीत वाढ, काही व्यापारी आणि कारखान्यांकडून होणारी साठेबाजी आणि जगभरात साखरेच्या पुरवठ्यात झालेली घट हीदेखील भाववाढीची कारणे असल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं आहे.
साखरेच्या किमतीतील वाढ केवळ भारतापुरती मर्यादित नाही. सरकारच्या अंदाजानुसार, 2026-27 मध्ये जगाला सुमारे 3.3 दशलक्ष टन साखरेच्या तुटवड्याचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेच्या किमती 30 जून रोजीच्या 474 डॉलर प्रति टनावरून 20 ऑगस्ट रोजी 552 डॉलर प्रति टनापर्यंत वाढल्या आहेत, म्हणजेच केवळ दोन महिन्यांत 16 टक्केपेक्षा जास्त वाढ झाली आहे.
दरम्यान, काही व्यापारी साठेबाजी करत असल्याचं बोललं जात आहे. साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी, सरकारने व्यापाऱ्यांवर 400 टन साठ्याची मर्यादा घातली आहे. हा नियम 1ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर 2026 पर्यंत लागू राहील. 1 सप्टेंबरपासून, मोठे खरेदीदार, किंवा घाऊक ग्राहक, 15 दिवसांपेक्षा जास्त साखरेचा साठा करू शकणार नाहीत. साठेबाजी आणि कृत्रिम टंचाई निर्माण करण्याचे प्रयत्न रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारची पथके साखर कारखान्यांना भेट देऊन साठ्याची पाहणी करत आहेत.
देशांतर्गत बाजारात पुरवठा वाढवण्यासाठी, सरकारने 10 लाख टन कच्च्या साखरेच्या आयातीला शुल्कमुक्त परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यांना आणि साखर कारखान्यांना 15 ऑक्टोबरपासून गाळप सुरू करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. सरकारच्या अंदाजानुसार, यामुळे ऑक्टोबरमधील साखर उत्पादन नेहमीच्या 30 ते 40 लाख टनांवरून 10 लाख टनांपेक्षा जास्त वाढू शकते. सरकारच्या मते, या उपायांमुळे सणासुदीच्या काळात साखरेची उपलब्धता वाढेल आणि भाववाढीचा दबाव कमी होण्यास मदत होईल.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.