जुलै महिन्यात उत्पादनात केली वाढ : मजबूत मागणीचा कंपन्यांना आधार : वाहन साठा पुरेसा करण्यासाठी कंपन्यांचे प्रयत्न


वृत्तसंस्था, नवी दिल्ली


येणाऱ्या काळात विविध उत्सवांची रेलचेल पाहायला मिळणार आहे. हा हंगाम साधण्यासाठी ऑटो क्षेत्रातील वाहन कंपन्यांनी जय्यत तयारी चालवली असल्याचे दिसून आले आहे. उत्सवी काळातील वाढती मागणी पूर्ण करण्याच्या इराद्याने वाहन कंपन्यांनी वाहनांच्या उत्पादनात जुलैमध्ये वाढ केली असल्याची माहिती उपलब्ध होते आहे. याचाच भाग म्हणून प्रवासी वाहनांच्या उत्पादनात जुलैमध्ये 26 टक्के इतकी वाढ विविध कंपन्यांनी केली आहे.


देशातील प्रवासी वाहनांच्या निर्मात्यांनी उत्पादनात वाढ करायला सुरुवात केली आहे. विव्रेत्यांकडील उपलब्ध स्टॉक लक्षात घेऊन त्याप्रमाणे उत्पादनाचे नियोजन केले जात आहे. यासोबत नवे मॉडेल सादर करण्याच्या हालचाली कंपन्यांकडून सुरु झाल्याचे कळते. उत्सवी काळाआधीच वाहन बुकिंगमध्ये वाढ झाली आहे. पण तरीही वाहन निर्मात्या कंपन्यांना आर्थिक वर्ष 2027 च्या दुसऱ्या सहामाहीत वृद्धी कमी राहिल अशी शंका वाटते आहे. फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डिलर्स असोसिएशन अर्थात फाडानुसार 74 टक्के डिलर्सना ऑगस्टमध्ये वाहन विक्रीत वाढीचा अंदाज वाटतो आहे. जुलैमध्ये त्यांचा अंदाज 51 टक्के इतका होता. उत्सवी हंगाम काबीज करण्यासाठी कंपन्यांनी तयारीला वेग दिलाय. प्रवासी वाहनांना विक्रेत्यांकडून 53 टक्के इतके बुकिंग वाढण्याची शक्यता सांगितली जात आहे.


जुलैमध्ये वाढले उत्पादन


सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स यांच्यानुसार जुलैमध्ये प्रवासी वाहनांचे उत्पादन वार्षिक आधारावर 26 टक्के वाढत 5 लाख 5 हजार 520 इतके झाले आहे. वाहन मागणी देशात वाढत 4 लाख 57 हजारवर पोहचली आहे. पहिल्या तिमाहीतील उत्तम प्रदर्शनानंतर आता कंपन्यांना उत्सवी हंगामाचे वेध लागले आहेत. एप्रिल ते जून अवधीत प्रवासी उत्पादन वार्षिक तत्वावर 16 टक्के वाढीसह 14.5 लाख वाहन इतके होते. फाडाच्या माहितीनुसार एप्रिल ते जून अवधीत प्रवासी वाहनांची नोंदणी 22 टक्के वाढीसोबत 12.6 लाख इतकी होती. त्यानंतर जुलैमहिन्यातही वाहन मागणी मजबूत राहिली. उत्पादनात त्यात महिन्यात 26 टक्के वाढ झाली.


.. वाहन साठ्यावर लक्ष


किरकोळ विक्रीच्या तुलनेत घाऊक वाहन पुरवठा करण्याचे प्रमाण वाढले आहे. 21 दिवसांच्या बदल्यात उद्योगात विक्रीसाठी सध्याचा साठा किंवा स्टॉक आता वाढून 33 ते 35 दिवसांवर राहिला आहे. प्रवासी वाहनांच्याबाबतीत विक्रेत्यांनी अधिक स्टॉक असल्याचे सांगितले आहे. जवळपास एक चतुर्थांश विक्रेत्यांकडे 25 टक्केपेक्षा अधिक जुना स्टॉक आहे.


Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.