सांगली जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका लांबल्याने 152 ग्रामपंचायतींचा कारभार सध्या माजी सरपंचांच्या हातात प्रशासक म्हणून आहे. या प्रशासकांचा सहा महिन्यांचा कार्यकाळ आज (दि. 27) संपला असून, त्यानंतर पुढील प्रशासकीय व्यवस्थेबाबत राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून अद्याप कोणतीही नवी अधिसूचना जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे ग्रामपंचायतींच्या कारभारासह रखडलेल्या विकासकामांबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. विकासकामांसाठी उपलब्ध असतानाही निधी खर्च करण्याचे अधिकार नसल्याने प्रशासकांना गावागावांतील विकासकामांना पुन्हा ब्रेक लागणार आहे.


सांगली जिह्यात 697 ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी 152 ग्रामपंचायतींवर माजी सरपंचांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे. ग्रामपंचायत निवडणुका लांबणीवर पडल्याने निवडणुका होईपर्यंत माजी सरपंचांनाच प्रशासक म्हणून कायम ठेवण्यात यावे, यासाठी काही माजी सरपंचांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. प्रकरण न्यायालयात असतानाच, राज्य शासनाने माजी सरपंचांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली. मात्र, प्रशासकांच्या नियुक्तीला आव्हान देत काही व्यक्तींनी पुन्हा उच्च न्यायालयात धाव घेतली. या न्यायालयीन प्रक्रियेमुळे प्रशासकांच्या अधिकारांवर मर्यादा आल्या आहेत.


सध्या ग्रामपंचायतींकडे उपलब्ध असलेला 15वा वित्त आयोगाचा निधी खर्चाविना पडून आहे. हा निधी मार्चपर्यंत खर्च करणे अपेक्षित आहे. मात्र, प्रशासकांकडे निधी नियोजन व विकासकामे करण्याचे अधिकार नसल्याने हा निधी वेळेत खर्च कसा होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्हा नियोजन समितीच्या वतीने (डीपीसी) ग्रामपंचायतींच्या विकासकामांना मंजुरी देण्यात आली आहे. काही कामांचे कार्यारंभ आदेशही आहेत. काम सुरू करण्यासाठी निर्णय घेण्याचे अधिकार प्रशासकांना नाहीत.


शासनाकडून माजी सरपंचांची ग्रामपंचायत प्रशासक म्हणून नियुक्ती करताना ‘पुढील आदेशापर्यंत’ असा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे 27 ऑगष्ट रोजी मुदत संपत असली, तरी पुढील आदेशाबाबत अद्याप स्पष्टता नाही. त्यामुळे जिह्यातील 152 ग्रामपंचायतींमध्ये काय होणार, याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत.


तालुकानिहाय मुदत संपलेल्या ग्रामपंचायती


–  मिरज 22, कवठे महांकाळ 11, जत 30, आटपाडी 10, तासगाव 39, पलूस 14, कडेगाव 9, खानापूर 13, वाळवा 2, शिराळा 2.


जिल्हा परिषदस्तरावर निर्णय घेऊ!


सांगली जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यात मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त करण्यात आले आहेत. विद्यमान सरपंच हेच प्रशासक असून, विद्यमान उपसरपंच व सदस्य यांची प्रशासकीय समितीही कार्यरत आहे. या सर्वांचा कार्यकाल आज (दि. 27) पूर्ण होत आहे. मात्र, त्यांचा कार्यकाळ संपला आहे की नाही, याबाबतचे कोणतेही आदेश प्राप्त झालेले नाहीत, परंतु जिल्हा परिषदस्तरावर प्रशासकाबाबत निर्णय घेतला जाईल, असे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) शशिकांत शिंदे यांनी सांगितले.



Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.