आणखी एक हिमनदी फुटण्याच्या मार्गावर, पुरात मृतांची संख्या 300, 273 भारतीय बेपत्ता


वृत्तसंस्था/काठमांडू


बुधवारी आलेल्या महापुराच्या संकटातून न सावरलेल्या नेपाळला पुन्हा एकदा पुराचा धोका निर्माण झाला आहे. या देशाच्या तिबेटला लागून असलेल्या सीमेवरील ‘बॅरियर सरोवर’ (हिमनदी) फुटण्याच्या मार्गावर असून येत्या तीन दिवसात पुन्हा महापूर येऊ शकतो, असा इशारा चीनने दिला आहे. हे सरोवर छोचेन खोला आणि पुरेपू त्सांगपो या हिमनद्यांच्या संगमानजीक निर्माण झाले आहे. ते पूर्ण भरले असून कोणत्याही क्षणी ओसंडू शकते, अशी स्थिती आहे. त्यामुळे सावधनतेचा इशारा देण्यात आला आहे. बुधवारच्या महापुरात मृत झालेल्यांची संख्या आता 300 हून अधिक झाली असून 1,500 हून अधिक बेपत्ता आहेत.


बेपत्ता लोकांमध्ये भारतीय नागरीकांची संख्या 273 असल्याची माहिती देण्यात आली. बॅरियर सरोवरासंबंधी चीनकडून आणखी माहिती देण्यात आली आहे. या सरोवरात हिमनद्यांपासून 20 लाख घनमीटर पाण्याची आवक गुरुवार सकाळपर्यंत झालेली आहे. ही आवक आणखी वाढल्यास हे सरोवर ओसंडू शकते आणि या पाण्याचा लोंढा उतारावरच्या भागांमध्ये अतिशय वेगाने येऊ शकतो, अशी स्थिती आहे. तसे झाल्यास नेपाळमधील आणखी खेडी पाण्याखाली जाऊन मोठी जिवीत आणि वित्त हानी होऊ शकते, असा इशारा अनेक तज्ञांनी नेपाळला दिला आहे.


भारताचे 288 नागरीक बेपत्ता


भारताच्या परराष्ट्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार भारताचे 288 नागरीक बुधवारच्या पुरात बेपत्ता झाले आहेत. त्यांच्यापैकी 73 जण नेपाळच्या ‘त्रिशुली-1’ या प्रकल्पावर काम करणारे कामगार आहेत. तामिळनाडूमधील दोन गट कैलास मानसरोवराच्या यात्रेसाठी गेलेले होते. हे दोन्ही गट बेपत्ता असून त्यांच्यात प्रत्येकी 37 आणि 49 यात्रेकरुंचा समावेश आहे. त्यांच्याशी संपर्क करणे अशक्य झाले असून शोधकार्य हाती घेण्यात आले आहे. बेपत्ता भारतीय यात्रेकरुंमध्ये 32 पश्चिम बंगालचे, 33 केरळचे आणि 61 इतर राज्यांचे असल्याचे स्पष्ट झाले आहे.


तिबेटमध्ये 200 अडकले


तिबेटमध्ये 200 भारतीय नागरीक अडकले आहेत. त्यांच्याशी संपर्क होत नव्हता. तथापि, आता संपर्क साधण्यात यश मिळाल्याचे वृत्त आहे. त्यामुळे त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. अन्य बेपत्ता भारतीयांशी संपर्क साधण्याचा सातत्याने प्रयत्न करण्यात येत असून त्यात थोडे यश मिळाल्याची माहिती आहे.


भारताकडून साहाय्यता सामग्री


भारताने आतापर्यंत नेपाळला 47.5 टन साहाय्यता सामग्री पाठविली आहे. ही सामग्री घेऊन भारताची दोन वाहतूक विमाने काठमांडूला पाठविण्यात आली असून या सामग्रीचे वितरण करण्यास प्रारंभ झाला आहे. या सामग्रीत औषधे, अत्यावश्यक कपडे, बिस्कीटे, खाण्याचे अन्य पदार्थ आदी आवश्यक वस्तूंचा समावेश आहे. भारताची चार हेलिकॉप्टर्स बचाव कार्यासाठी पाठविण्यात आली आहेत. त्यांनी घटनास्थळी कार्याला प्रारंभ केला आहे. भारताची आणखी बचाव पथके सज्ज ठेवण्यात आली असून ती अनुमतीच्या प्रतीक्षेत ठेवण्यात आली आहेत.


21 पर्यटकांना वाचविण्यात यश


आतापर्यंत बचाव पथकांना 21 भारतीय पर्यटकांना वाचविण्यात यश आले आहे. तसेच नेपाळचेही 95 नागरीक या संकटातून वाचले आहेत. वाचलेल्या 11 भारतीयांची ओळख पटविण्यात आली आहे. या महापुरामुळे नेपाळच्या अनेक पायाभूत सुविधा प्रकल्पांची मोठी हानी झाली असल्याने भविष्यातही स्थिती लवकर सुधारण्याची शक्यता नाही. अनेक वीजप्रकल्पांची हानी झाली असून पूरस्थिती सुधारल्यानंतरच त्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेता येणार आहे. हानीच्या सर्वेक्षणाचे कार्य नेपाळच्या पायाभूत सुविधा विभागाने हाती घेतले आहे, अशी माहिती आहे.


अनेक सेतू नष्ट


बुधवारी हिमनदी फुटल्याने पाण्याचा लोंढा खालच्या भागात असलेल्या भोटेकोशी आणि त्रिशुली या नद्यांच्या पात्रांमध्ये शिरला. त्यामुळे या नद्यांची पातळी अचानक वाढली आणि आसपासच्या खेड्यांमध्ये वेगाने पाणी घुसले. अनेक इमारती नष्ट झाल्या. शेकडो नागरीक आणि पर्यटक वाहून गेले. या विनाशकारी महापुरात 19 सेतू, 40 किलोमीटर लांबीचा महामार्ग आणि 9 जलविद्युत प्रकल्प पूर्णत: नष्ट झाले आहेत. महापुरामुळे या नद्यांची पातळी नेहमीपेक्षा 30 फूट वाढली. त्यामुळे अतोनात हानी झाली. हानीचे नेमके प्रमाण पूर ओसरल्यानंतर समजणार आहे.


Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.