>> एकनाथ आव्हाड
[email protected]
‘एआई, काखेत कळसा आणि गावाला वळसा म्हणजे नेमकं काय गं?’ वैष्णवीने अभ्यास करता करता आईला विचारलं.
‘अगं ही एक म्हण आहे. कशासाठी हवाय या म्हणीचा अर्थ?’
‘अगं उद्या परिपाठात या म्हणीवर आधारित गोष्ट सांगायला सांगितलीय सरांनी मला. आई, सांग ना मला, काखेत कळसा आणि गावाला वळसा म्हणजे नेमकं काय ते?’
‘अगं, म्हणजे एखादी वस्तू आपल्या जवळ असताना त्या वस्तूचा शोध आपण सर्व ठिकाणी घेत राहणं.’
वैष्णवी पटकन म्हणाली, ‘अरेच्चा…! असं आहे का ते. आठवलं, आपले बाबा एकदा चष्मा घरभर शोधत होते आणि तो चष्मा होता त्यांच्या डोक्यावरच.’
आई म्हणाली, ‘एखाद्या बाईच्या कमरेवर काखेत कळशी असते, मात्र ती गावभर कळशी शोधत फिरते. अगदी तशीच स्थिती झाली की मग म्हणतात असं.’
‘छान..! आता बघ मी मस्त गोष्ट लिहून काढते यावर.’ असं बोलून वैष्णवी गोष्ट लिहायला बसली. दुसऱया दिवशी ती शाळेत वेळेत पोहोचली. तिने परिपाठाचे केलेले नियोजन आणि झालेले सादरीकरण पाहून वर्गशिक्षक भागवत सर खूप खूष झाले. सुंदर परिपाठाने अभ्यासाची सुरुवात झाली होती.
पहिला तास भागवत सरांचा. ते मुलांना म्हणाले, ‘मुलांनो, या म्हणी म्हणजे अनुभवांच्या खाणीच. आज आपण एक खेळ खेळूया. पशुपक्ष्यांच्या नावांचा उल्लेख असणाऱया म्हणी तुम्ही मला आणि मी तुम्हाला सांगायच्या… खेळूया?’
वैष्णवी पटकन म्हणाली, ‘सर, मी सुरुवात करू?’ सरांचा होकार मिळताच ती म्हणाली, ‘अडला हरी गाढवाचे पाय धरी.’
दिनेश म्हणाला, ‘आंधळं दळतं आणि कुत्रं पीठ खातं.’
आता सर म्हणाले, ‘उंदराला मांजर साक्ष.’ मुलांची आणि सरांची खऱया अर्थाने आता चढाओढ सुरू झाली. मुलांनी एक म्हण सांगितली की सर लगेच दुसरी एक म्हण सांगायचे. खेळता खेळता पशुपक्ष्यांचा उल्लेख असलेल्या केवढय़ा तरी म्हणींची यादी वर्गात तयार झाली.
‘अगं अगं म्हशी मला कुठे नेशी, कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही, कोंबडे झाकले तरी तांबडे फुटायचे राहात नाही, कोल्हा काकडीला राजी, कोह्याला द्राक्षे आंबट, कुत्र्याचे शेपूट नळीत घातले तरी वाकडे ते वाकडेच, गाढवाला गुळाची चव काय, गाढवांचा गोंधळ आणि लाथांचा सुकाळ, गाढवापुढे वाचली गीता आणि कालचा गोंधळ बरा होता, गोगलगाय आणि पोटात पाय, घोडा मैदान जवळ असणे, घरचे झाले थोडे आणि व्याह्याने धाडले घोडे, डोंगर पोखरून उंदीर काढणे, दुभत्या गायीच्या लाथा गोड, बैल गेला झोपा केला, मांजराच्या गळ्यात घंटा कोणी बांधावी, मुंगी होऊन साखर खावी, पण हत्ती होऊन लाकडे फोडू नये, माकडाच्या हाती कोलीत, वरातीमागून घोडे, शेळी जाते जीवानिशी आणि खाणारा म्हणतो वातड कशी, सरडय़ाची धाव कुंपणापर्यंत, हत्ती गेला पण शेपूट राहिले…’
बापरे! एक ना दोन, पशुपक्ष्यांचा उल्लेख असलेल्या केवढय़ा या म्हणी! मराठी भाषेचे हे वैभवच. मुलांना आश्चर्य वाटले. वैष्णवीला तर या म्हणींचा अर्थ आणि या म्हणींमागची कहाणी समजून घेण्याची उत्सुकताच लागली. शाळेतून ती घरी आल्यावर तिने आईला शाळेत म्हणींचा खेळ कसा रंगला त्याची इत्यंभूत माहिती दिली. विविध विषयांवरील म्हणींचा शोध घेण्याचा तिने चंगच बांधला. हा मनमोकळा संवाद त्यांचं आनंदाचं इंद्रधनुष्य आपसूक फुलवून गेला.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.