आदिवासी विकास विभागाच्या अनागोंदी कारभाराविरुद्ध ईदगाह मैदानावर विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. मुंबईत शनिवारी झालेल्या बैठकीत समाधानकारक निर्णय न झाल्याचे या आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे, त्यामुळे त्यांचे उपोषण व आंदोलन सुरूच आहे. 1 सप्टेंबरला आदिवासी विकास आयुक्तालयावर मोर्चा काढण्यात येणार असून त्यांना आता महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या माध्यमातून आदिवासी विकास विभागातील कर्मचारी, गृहपाल, अधीक्षक यांनीही जाहीर पाठिंबा दिल्याची माहिती विद्यार्थी प्रतिनिधी प्रशांत गावंढे यांनी दिली.
गडचिरोली जिह्यातील आश्रमशाळेत सर्पदंशाने मृत्युमुखी पडलेल्या तीन विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक कोटी रुपये, तर जखमींना पन्नास लाखांची भरपाई मिळावी; संबंधित दोषी अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी; राज्यातील विषबाधांसह विविध घटनांमध्ये दोन वर्षांत 584 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला त्याची जबाबदारी स्वीकारून आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी राजीनामा द्यावा आदी मागण्यांसाठी हजारो विद्यार्थ्यांनी 18 व 20 ऑगस्ट रोजी आदिवासी विकास आयुक्तालयावर धडक दिली. तेव्हापासून ईदगाह मैदानावर आंदोलन सुरू आहे. उपोषणकर्ते विवेक गावीत, लक्ष्मी जाधव व राहुल पावरा यांच्यावर तीनदा जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले, ते पुन्हा आंदोलनस्थळी दाखल झाले आहेत. मंत्री अशोक उईके यांनी शुक्रवारी येथील आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. मात्र त्या वेळी झालेली चर्चा निष्फळ ठरली. त्यांना विद्यार्थ्यांच्या नाराजीलाही सामोरे जावे लागले.
शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदिवासी विद्यार्थी प्रतिनिधींसोबत मुंबईत बैठक घेतली. मात्र त्यातही संभ्रम निर्माण केला गेला असल्याचे येथील विद्यार्थी प्रतिनिधींचे म्हणणे आहे. त्यामुळे नाशिकमधील विद्यार्थी आंदोलनावर ठाम आहेत. महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या माध्यमातून आदिवासी विकास विभागातील गृहपाल, अधीक्षक यांनीही आज पत्रकार परिषद घेत आंदोलनाला पाठिंबा दिला.