दिल्ली जल बोर्ड घोटाळा प्रकरणात दिलासा
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
दिल्ली सरकारमधील माजी मंत्री सत्येंद्र जैन यांना राऊस अॅव्हेन्यू न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. दिल्ली जल बोर्ड घोटाळा प्रकरणात न्यायालयाने गुरुवारी सत्येंद्र जैन यांना जामीन मंजूर केला. न्यायालयाने जैन यांना दोन जामीनदारांसह 2 लाख रुपयांचा वैयक्तिक जामीन सादर करण्याचे निर्देश दिले. यापूर्वी जैन यांची ऑक्टोबर 2024 मध्ये तिहार तुरुंगातून सुटका झाली होती. मनी लाँड्रिंग प्रकरणात त्यांनी 872 दिवस तुरुंगात घालवले होते. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) त्यांना 30 मे 2022 रोजी अटक केली होती. त्यानंतर दिल्ली न्यायालयाने त्यांना 18 ऑक्टोबर 2024 रोजी जामीन मंजूर केला होता.
आम आदमी पक्षाचे नेते असलेल्या जैन यांच्यावर दिल्ली जल बोर्ड एसटीपी घोटाळ्यात सामील असल्याचा आरोप आहे. जैन यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर 27 महिन्यांनी त्यांची अटक झाली, या काळात त्यांना फक्त एकदाच चौकशीसाठी बोलावण्यात आले होते आणि जेव्हा त्यांना पुन्हा बोलावण्यात आले तेव्हा त्यांना अटक करण्यात आल्याचा युक्तिवाद सुनावणीदरम्यान सत्येंद्र जैन यांचे प्रतिनिधित्व करणारे वकील एन. हरिहरन यांनी केला. दिल्ली जल बोर्डाच्या एसटीपी प्रकल्पांच्या निविदा प्रक्रियेतील कथित अनियमिततेप्रकरणी सत्येंद्र जैन यांना लाचलुचपत प्रतिबंधक शाखेने (एसीबी) 18 ऑगस्ट रोजी अटक केली होती. त्यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा (पीसी कायदा) आणि भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.