Swapnil Rajshekhar Shares Post: मराठी सिनेसृष्टीत (Marathi Film Industry) बरेच कलाकार असे आहेत, जे अभिनयासोबतच लेखन, दिग्दर्शन आणि सूत्रसंचालकांची भूमिका दमदार पद्धतीनं निभावतात. त्यापैकीच एक नाव म्हणजे, स्वप्नील राजशेखर (Swapnil Rajshekhar). बऱ्याचदा राजकीय, सामाजिक विषयांवर अभिनेते स्वप्नील राजशेखर आपलं मत रोखठोकपणे मांडत असतात. सोशल मीडियावरही ते अनेक विषयांवर व्यक्त होतात. अशातच नुकतीच त्यांनी एक लांबलचक पोस्ट शेअर करुन मातृभाषा मराठीवर (Marathi Language) आपलं परखड मत व्यक्त केलंय.
सध्या पुण्यातील गणेशोत्सवात (Ganeshotsav) डीजेला विरोध करणारे आणि मराठीवर अंचबित करणारं प्रभूत्व असणारे विद्यानंद बापट (Vidyanand Bapat) भलतेच चर्चेत आले आहेत. त्यांच्या अस्खलित मराठी बोलण्यानं सारेच अचंबित झाले आहेत. अशातच आता अभिनेते स्वप्नील राजशेखर यांनी फेसबुकवर पोस्ट (Facebook Post) केली आहे. विद्यानंद बापटांइतकी (Vidyanand Bapat Pune) नसेल, तरी माझीसुद्धा मातृभाषा चांगलीय..., असं स्वप्नील राजशेखर यांनी म्हटलंय. तसेच, मराठी कलाकाराना हिंदीत बोलायची फार खाज… काय गरज आहे हिंदीत विडीयो करायची. तुमच्या सारख्यांमुळे मराठी मरतेय, असंही ते पोस्टमध्ये म्हणाले आहेत.
स्वप्नील राजशेखर यांची पोस्ट जशीच्या तशी, नेमकं काय म्हणालेत? (Swapnil Rajshekhar Facebook Post)
“तुम्हा मराठी कलाकाराना हिंदीत बोलायची फार खाज…. काय गरज आहे हिंदीत विडीयो करायची. तुमच्या सारख्यांमुळे मराठी मरतेय. ”
(माझ्या एका हिंदी भाषेतील रीलवर ही कमेंट आली….
ईंग्रजीत स्वतःचे नाव लिहीलेल्या आणि मधेच एका दाक्षिणात्य चित्रपटाचं प्रमोशनची पोस्टसुध्दा अकाउंटवरुन केलेल्याची ही कमेंट होती…. अर्थात ही एकच नव्हे… असा अनेक कमेंट्स येत असतात…..
त्याला मी दिलेलं हे उत्तर!!
दुर्दैवाने अशा महाभागांना सुसंवाद चर्चा यात रस नसतोच…. हातात माध्यम आहे म्हणून संधी मिळाली की दुसऱ्याची सालटी काढायला सरसावतात.. त्यामुळे उत्तर देतानाही माझ्या स्वभावाशी विसंगत असा आक्रमक आवेश आलाय नाईलाजाने…. उत्तर पुढील प्रमाणे…)
महाशय, तुमचाही फारच गोंधळ झालेला दिसतोय.
मातृभाषेवर प्रेम करणं, स्वतःच्या भाषेचा अभिमान बाळगणं, तिचा प्रसार आणि प्रचार करणं आणि दुसऱ्या भाषांचा द्वेष करणं किंवा स्वतःला कोणत्याही ज्ञानभाषेपासुन संकुचित ठेवणं या सर्वथा भिन्न गोष्टी आहेत. त्यातला फरक ओळखा.
उदा. कधीकाळी जहाजबांधणीचं अद्ययावत तंत्र विकसित करणाऱ्या भारतात कधीतरी अचानक “समुद्रसफर केल्याने धर्म बुडतो” ही समजूत रुजली आणि पुढे कित्येक शतकं ती राहिली. भारतीयांनी समुद्रसफर करणं जवळपास सोडून दिलं.
आणि मग जे दर्यावर राज्य करत होते, असे परकीय समुद्रमार्गेच आपल्या देशात आले. त्यांनी आपल्या देशाची लूट केली….
छत्रपती शिवाजी महाराजांनी दर्याचं महत्त्व आणि सामर्थ्य ओळखलं आणि स्वतंत्र आरमार उभारलं. छत्रपती शिवराय हे सागरी सामर्थ्य ओळखणारे, स्वतःचं आरमार उभारणारे भारतातले एक द्रष्टे छत्रपती ठरले.
संकुचितपणाच्या मर्यादा छत्रपतीनी तोडल्या….
खरंतर आपण मराठीजनानी छत्रपती शिवरायांच्या जीवनाचा आदर्श घेतला तरी पुरेसं आहे. मग वेगळं काहीच शिकण्याची आवश्यकता नाही.
छत्रपती संभाजी महाराजांचं अनेक भाषांवर प्रभुत्व होते. त्यांनी विविध भाषांमध्ये काव्यनिर्मीती, ग्रंथरचना केली आणि आवश्यकतेनुसार संस्कृत, ईंग्रजी, फारसी, फ्रेंच अशा विविध भाषांमध्ये वेळोवेळी संवादही साधला.
छत्रपती संभाजी महाराजांचा आदर्श आपण घ्यायचा नाही, तर मग कोणाचा घ्यायचा?
माझ्यापुरतं बोलायचं झालं, तर माझी मातृभाषा मराठी मला अत्यंत प्रिय आहे आणि तिचे विविध लहजे आत्मसात करण्याचा मी मनापासून प्रयत्न करतो.
मायमराठीच्या किमान चार-पाच बोली लहज्यांमध्ये मी बोलू शकतो.
माझ्या ग्रंथसंग्रहात 70% पुस्तकं मराठी भाषेतील आहेत. त्यावर माझा पिंड पोसलाय…. मुख्यत्वे मराठी भाषेतच मी गेली २८ वर्षे कलावंत म्हणून काम करतोय… मराठी जनांच माझ्या मगदूराप्रमाणे रंजन करण्याचा प्रयत्न करतोय…
माझ्या पॉडकास्ट किंवा माझ्या मुलाखतीत मला माझं म्हणणं मांडण्यासाठी माझी मराठी पुरते….
अकारण so, you know करत बोलण्याची आवश्यकता मला भासत नाही.
बापटांइतकी नसेल, तरी माझीसुद्धा मातृभाषा चांगली आहे. आणि त्याचा मला आनंद आहे…
त्याचबरोबर, मला हे सोशल मीडियाचं सशक्त माध्यम मिळालंय त्यावरुन मी माझ्या कोल्हापुरी मायबोलीचा प्रसार आणि प्रचार करत असतो, तिचा गोडवा सांगत असतो. त्याच वेळी इतर सर्व बोलींबद्दलचा आदरही राखतो आणि त्या आत्मसात करण्याची तयारी ठेवतो.
माझ्या मातृभाषेचं ऋण मानतो …
प्रेमानं आणि अभिमानानं ते फेडण्याचा प्रयत्न यथाशक्ती सुरु आहे...
माझ्या मातृभाषेचा अपमान अनादर मी कधीच सहन करणार नाही…. तसं करणाऱ्याला योग्य उत्तर देण्यास मी स्वतः समर्थ आहे. ते कुणी मला शिकवण्याची आवश्यकता नाही….
आणि याचा अर्थ असा नाही की मी ईतर भाषात कधी व्यक्तच होऊ नये…. आणि देशभरातील, जगभरातील प्रेक्षकांना नाकारावं.
मी कलावंत म्हणून माणूस म्हणूनही संकुचित राहणार नाही. मी आवश्यकतेनुसार सगळ्या भाषांमधे व्यक्त होत रहाणार….
पुन्हा मला भाषेबद्दल काही ‘शिकवावं’ असा विचार तुमच्या मनात आला, तर मी किमान काहीतरी माझ्या मातृभाषेसाठी करतोय.. तुम्ही सोशल मिडीयावर कमेंटस करण्याशिवाय काय करता, हा प्रश्न कृपया आधी स्वतःला विचारा.
पण भाषाविषयक काही सुसंवाद करायचा असेल तर कधीही बोलुया…
धन्यवाद.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.