पश्चिम बंगाल सरकारचा निर्णय
वृत्तसंस्था/ कोलकाता
बॉलीवूड आणि बंगाली चित्रपट अभिनेते मिथून चक्रवर्ती यांची पश्चिम बंगाल सरकारच्या नव्या सांस्कृतिक सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी गुरुवारी न्यू टाऊन येथील ‘उत्तम कुमार फिल्म सेंटर’च्या पायाभरणी समारंभात ही घोषणा केली. प्रसिद्ध अभिनेते उत्तम कुमार यांच्या जन्मशताब्दीनिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उत्तम कुमार यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यासाठी बंगाल सरकारने स्थापन केलेल्या विशेष उच्चस्तरीय सल्लागार समितीचे भाजप नेते मिथून चक्रवर्ती यांची सह-संरक्षक म्हणून यापूर्वीच नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यासोबत सांस्कृतिक राज्यमंत्री पूर्णिमा चक्रवर्ती याही सह-संरक्षक आहेत.
राज्याचे सांस्कृतिक सल्लागार म्हणून नियुक्ती झाल्यानंतर अभिनेते मिथून चक्रवर्ती यांनी पश्चिम बंगालमध्ये चित्रित होणाऱ्या चित्रपटांसाठी 30 टक्के कर अनुदानाची मागणी केली. त्यांच्या या मागणीला मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी तात्काळ मंजुरी दिली. पश्चिम बंगाल एकेकाळी भारतीय चित्रपटसृष्टीचे प्रतिनिधित्व करत होते, परंतु राजकीय हस्तक्षेपामुळे परिस्थिती बदलली आहे. त्यांनी बंगाली चित्रपटसृष्टीशी संबंधित कलाकार, निर्माते आणि दिग्दर्शकांना एकत्र काम करण्याचे आवाहन केले.
राज्यमंत्र्यांसमान दर्जा मिळणार
अधिकृत सूत्रांनुसार, पश्चिम बंगालचे सांस्कृतिक सल्लागार म्हणून मिथून चक्रवर्ती यांना राज्यमंत्र्यांप्रमाणेच पगार आणि सुविधा मिळतील. तथापि, राज्य सरकारने अद्याप या विशेष सल्लागार पदासाठी वेतनश्रेणी, मानधन किंवा इतर सुविधांविषयी अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.