वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरासह चार खेळाडूंचीच फिटनेस परीक्षा होणार आहे. अफगाणिस्तानविरुद्ध 13 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या टी-20 मालिकेआधी बुमरा, हर्षित राणा, वॉशिंग्टन सुंदर आणि नितीश रेड्डी यांना 4 ते 9 सप्टेंबरदरम्यान सराव सामन्यांमध्ये उतरवले जाणार आहे. या सामन्यांमधील कामगिरी आणि शरीराची क्षमता पाहूनच त्यांच्या फिटनेसवर अंतिम शिक्कामोर्तब केले जाईल.
हे सामने बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्सने (सीओई) निश्चित केले आहेत. चौघेही वेगवेगळय़ा दुखापतींमुळे हिंदुस्थानच्या अलीकडील क्रिकेट मोहिमांपासून दूर होते. वैद्यकीय तपासणीत चौघे ‘क्लिनिकली फिट’ असल्याचे स्पष्ट झाले असले तरी प्रत्यक्ष सामन्याचा ताण पेलण्याची त्यांची क्षमता अद्याप तपासायची आहे.
बुमराचा बॅकअपही सज्ज
बुमराच्या फिटनेसबाबत कोणताही धोका पत्करू नये म्हणून त्याचा पर्याय म्हणून प्रिन्स यादवला तयार ठेवण्यात आले आहे. प्रिन्सने याच वर्षी जूनमध्ये हिंदुस्थानकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. बुमराने लाल चेंडूचे क्रिकेट खेळून जवळपास वर्ष उलटले आहे. त्यामुळे वर्षाच्या अखेरीस न्यूझीलंड दौऱयात कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यापूर्वी त्याने काही सामने खेळावेत अशी संघ व्यवस्थापनाची भूमिका आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमधील दीर्घ स्पेल आणि पूर्ण सामन्याचा ताण बुमराचे गुडघे पेलू शकतात की नाही, याची खात्री करण्यासाठी त्याला रेड-बॉल क्रिकेटमध्ये उतरवण्याची योजना आहे. टी-20 मालिकेआधीचा हा फिटनेस कसोटी सामना त्यामुळे बुमराच्या पुढील कसोटी मोहिमेची दिशा ठरवणारा ठरू शकतो.
बुमराच्या पुनरागमनावर विशेष लक्ष
अफगाणिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी बुमराचा संघात समावेश करण्यात आला आहे, मात्र त्याचा अंतिम सहभाग फिटनेस मंजुरीवर अवलंबून आहे. त्यामुळे 4 ते 9 सप्टेंबरदरम्यान होणारे सराव सामने बुमरासाठी महत्त्वाची कसोटी ठरणार आहेत. ‘सीओई’च्या वैद्यकीय पथकाने मागील आठवडय़ात निवड समितीला अहवाल दिला.