हिंदुस्थानचा स्टार वेगवान गोलंदाज आणि अभिनेत्री समरीन कौर यांच्या प्रेमाच्या चर्चा सध्या क्रीडा वर्तुळासह बी टाऊनमध्ये रंगल्या आहेत. अर्थात क्रिकेट आणि अभिनेत्री यांची प्रेमप्रकरणं काही नवीन नाहीत. याआधीही अनेक स्टार खेळाडूंनी अभिनेत्रींना डेटही केले आणि त्यांच्यासोबत लग्नाचा बारही उडवून दिला. पण आता अर्शदीप आणि समरीन पुन्हा एकदा चर्चेत येण्याचे कारणही खास आहे. दोघांनी आपल्या प्रेमाची जाहीर कबुली दिली असून रोमँटिक अंदाजामध्ये एकमेकांची नावेही शरीरावर गोंदवली आहेत. याचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.
अर्शदीप सिंग याने आपल्या हातावर एसके (SK) नावाचा टॅटू बनवला आहे. समरीन कौर हिच्या नावातील पहिले अक्षरं अर्शदीपने आपल्या उजव्या हातावर गोंदवून घेतली आहेत. तर समरीनने तिच्या डाव्या हातावर एएस (AS) नावाचा टॅटू बनवला आहे. दोघांच्या टॅटूच्या डिझाईनमध्ये एक छोट्या लाल रंगाच्या हार्टचाही समावेश करण्यात आलेला आहे. दोघांनीही हे टॅटू प्रसिद्ध एलियन्स टॅटू स्टुडिओतून बनवून घेतले आहेत.
अर्शदीप आणि समरीन नेहमीच सोशल मीडियावर एकत्र फोटो शेअर करत असतात. काही आठवड्यांपूर्वी समरीनने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला होता. यावर अर्शदीपने ‘My Person’ अशी कमेंट केली होती. या कमेंटने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले होते. विशेष म्हणजे आज, सोमवारी समरीन कौरचा वाढदिवस असून याच निमित्ताने हे टॅटूचे फोटो तुफान चर्चेत आले आहेत.
कोण आहे समरीन कौर?
समरीन कौर ही मॉडेलिंग आणि अभिनयाच्या विश्वातील एक नावाजलेला चेहरा आहे. 2018 मध्ये ‘फेमिना मिस इंडिया’ स्पर्धेत तिने जम्मू-कश्मीरचे प्रतिनिधित्व केले होते आणि फायनालिस्टपर्यंत मजल मारली होती. समरीनने ZEE5 च्या ‘नेल पोलिश’ या लोकप्रिय वेब सीरिजमध्ये काम केले आहे. याशिवाय तिने ’83’ आणि ‘सरदार जी 2’ सारख्या चित्रपटांमध्येही महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.