पुणे : पुण्यातील पेरूगेट पोलीस चौकीच्या हद्दीतून एका 28 वर्षीय तरुणाचे अपहरण झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. डायल 112 वरून माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ (Pune Crime News) चक्रे फिरवत अवघ्या 53 मिनिटांत तरुणाची सुटका केली असून दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. प्रसाद सूर्यवंशी (वय 28) असे सुटका करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्री सुमारे 12:30 वाजता डायल 112 वर एका काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीतून (क्र. MH 12 9696) प्रसाद सूर्यवंशी याचे अपहरण झाल्याचा कॉल पोलिसांना मिळाला. माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने नाकाबंदी आणि माग काढत पाठलाग सुरू केला. रात्री 1:23 वाजता सिंहगड रोडच्या दिशेने जाणाऱ्या (Pune Crime News) आरोपींच्या तावडीतून पीडित तरुणाची यशस्वी सुटका करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी सागर रमेश बोराडे (वय 32, व्यवसाय- हॉटेल व्यावसायिक, रा. वालचंदनगर) आणि किशोर बाळासाहेब सावंत (वय 32, रा. दसर, ता. माळशिरस, जि. सोलापूर) या दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे.(Pune Crime News)
पीडित तरुण प्रसाद आणि आरोपी सागर बोराडे याची एक महिला मित्र हे दोघेही पुण्यात स्पर्धा परीक्षेची (Competitive Exams) तयारी करत आहेत. पीडित तरुण आपल्या महिला मित्राशी बोलत असल्याच्या रागातून आरोपी सागर याने त्याच्या इतर तीन साथीदारांच्या मदतीने हे कृत्य केले. आरोपींनी प्रसादला मारहाण करत त्याच्याच स्कॉर्पिओ गाडीतून पळवून नेण्याचा प्रयत्न केला. अपहरण झालेल्या तरूणाची सुटका केल्यानंतर त्याची तातडीने वैद्यकीय तपासणी (Medical) करण्यात आली आहे. या प्रकरणी एकूण चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, ताब्यात घेतलेल्या दोघांव्यतिरिक्त उर्वरित दोन फरार साथीदारांचा पोलीस गांभीर्याने शोध घेत आहेत. पोलिसांच्या सतर्कतेमुळे आणि तातडीच्या कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला आहे.
ज्या मुलाचा अपहरण झालं त्या प्रसाद सूर्यवंशी (वय 28) याने माध्यमांशी बोलताना सांगितलं की, रात्री साडेअकरा बारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली, ते सर्वजण आलेले आरोपी त्यांच्यातील कोणालाही तो ओळखत नव्हता, किंवा कधी त्यांना पाहिलेलं देखील नव्हतं, त्यांनी मला मारहाण केली त्यानंतर मला जबरदस्तीनं त्यांच्या गाडीत बसवलं, त्यांच्या दोन गाड्या होत्या, मी माझ्या मित्रांना आणि क्लासच्या बाहेर असणाऱ्यांना पोलिसांना कॉल करायला सांगितलं, ते मला सिंहगड रोडला घेऊन गेले, तिथंही त्यांनी मला मारहाण केली, माझ्या मित्रांनी आणि क्लासजवळ असलेल्या मैत्रिणींनी पोलिसांना कळवलं, पोलिसांनी लगेचच तपास करून मदत केली, मला पोलिसांचं सहकार्य मिळालं. मी कोणत्याच मुलीला बोलत नव्हतो. माझ्या रूम पार्टनरची पीजी आहे तिथे अनेक मुली राहतात, त्यातील एका नाही तर चार पाच मुली आमच्यासोबत बोलत होत्या, अभ्यासाबाबत काही असेल तर तितकंच बोलणं व्हायचं, मी कोणत्या एका मुलींसोबत बोलत नव्हतो,पण त्यांनी संशय घेऊन मला मारहाण केली आणि ती मुलगी मला बोलत होती मी तिच्याशी कधीही बोलायला गेलो नाही ती माझी मैत्रीण नाही, फक्त ओळख आहे, एकदा तिने माझ्या गाडीच्या जागी तिची गाडी लावली होती, तेव्हा मी तिला त्याचा फोटो टाकून विचारलं होतं, तेवढ्याच बोलण्यावरून त्या मुलीची आणि आरोपीची भांडणं देखील झाली होती. मी याबाबत पोलिसांत तक्रार दिलेली आहे, माझा त्या मुलीशी काहीही संबंध नाही, माझे कॉल मेसेज आणि सीडीआर देखील काढू शकता, मी पोलिसांकडे सर्व माहिती आणि तपशील दिला आहे, त्यांच्याकडून देखील तुम्ही तपासू शकता असंही पुढे प्रसादने म्हटलं आहे.
"काल रात्री साडेअकराच्या सुमारास हा संपूर्ण प्रकार घडला. आरोपी मला 'मला तुझ्याशी बोलायचे आहे' असे सांगून जबरदस्तीने घेऊन जात होते आणि सतत धमक्या देत होते, पोलीस वेळेवर आले नसत्ये तर बीडसारखा प्रकार घडला असता अशी आपबिती प्रसादने सांगितली आहे.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.