बातमी शेअर करा :


































सामनाचे अनुसरण करा







अंगावर साधी साडी, पायात स्लीपर पण डोळ्यात मात्र दोन मुलींच्या भविष्याची स्वप्नं रंगवत रमाबाई रणवीर या बीडची मॅरेथाॅन जिंकल्या. ही मॅरेथाॅन जिंकल्यानंतर अवघ्या महाराष्ट्रात रमाबाई रणवीर यांचे नाव वेगाने पसरले. तरुणांना मागे टाकत रमाबाईंनी बीडची मॅरेथाॅन जिंकताच माध्यमांनाही दखल घेणे भाग पडले. अनवाणी मॅरेथॉन धावणाऱ्या बीडमधील अंबाजोगाई येथील 47 वर्षीय रमाबाई रणवीर यांच्या जिद्दीची दखल आता मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही घेतली आहे. मुलींच्या शिक्षणासाठी निधी उभारण्याच्या उद्देशाने रमाबाईंनी अनवाणी मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला होता. त्यांच्या या प्रेरणादायी प्रवासाची कहाणी सचिनपर्यंत पोहोचल्यानंतर त्याने त्यांना रनिंग शूजची जोडी भेट देत मदतीचा हात पुढे केला आहे.


रमाबाई रणवीर यांनी अनवाणी पायांनी मॅरेथॉनमध्ये धावत सहभाग घेतला होता. या स्पर्धेत त्यांना 3 हजार रुपयांचे बक्षीसही मिळाले. ही रक्कम मुलींच्या शिक्षणासाठी वापरण्याचा त्यांचा निर्धार आहे. त्यांच्या जिद्दीची कहाणी समजल्यानंतर सचिनने त्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला. रमाबाईंकडे स्वतःचा फोन नसल्याने सचिनच्या टीमने ‘टेन एक्स यू’ आणि काही परिचितांच्या मदतीने त्यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर अंबाजोगाई येथे त्यांच्यासाठी रनिंग शूज पाठवण्यात आले.


मात्र, रमाबाईंच्या उदार मनाने या मदतीला आणखी एक भावनिक वळण मिळाले. मॅरेथॉनबद्दल माहिती देऊन आपल्याला स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करणाऱ्या व्यक्तीलाही शूजची जोडी मिळावी, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. त्यांच्या या विनंतीचा मान ठेवत रमाबाई, त्यांच्या दोन मुली आणि त्या व्यक्तीसाठी शूजची व्यवस्था करण्यात आली. आपली कहाणी सचिन तेंडुलकरपर्यंत पोहोचली आणि त्याला आपली जिद्द प्रेरणादायी वाटली, याचा रमाबाईंना विशेष आनंद झाला. मिळालेले शूज त्यांच्यासाठी महत्त्वाचे आहेतच; मात्र, मुलींच्या चांगल्या भविष्यासाठी आपण करत असलेल्या प्रयत्नांची सचिनसारख्या दिग्गजाने दखल घेतली, ही बाब त्यांच्यासाठी त्याहून अधिक मोलाची ठरली.







Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.