बातमी शेअर करा :


































सामनाचे अनुसरण करा






महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटल्याने राज्यातील वातावरण चांगलेच तापले असून एमपीएससीचे विद्यार्थी ठिकठिकाणी रस्त्यावर उतरले आहेत. याच दरम्यान राज्यभरातून आलेल्या एमपीएससीच्या विद्यार्थी प्रतिनिधींची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली आणि या प्रकरणी एसआयटी स्थापन करण्याचे आश्वासन दिले. यावरून शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी जोरदार हल्ला चढवला. एसआयटीचे महाराष्ट्राला अजीर्ण झाले असून आतापर्यंत स्थापन केलेल्या 57 एसआयटीचे काय झाले? असा सवाल संजय राऊत यांनी नांदेड येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.


देवेंद्र फडणवीस यांच्या काळात आतापर्यंत 57 एसआयटी स्थापन झाल्या. ही 58 वी एसआयटी असेल. काय झाले की एसआयटी. या एसआयटीचे महाराष्ट्राला अजीर्ण झाले आहे. एसआयटी स्थापन केल्यामुळे काय होते, निकाल काय लागतो? महाराष्ट्रातील हजारो मुलं एमपीएससीने बाधित झाले असून आज ते रस्त्यावर उतरलेले आहेत, आत्महत्या करत आहेत. तुम्ही त्यांना दिमागी नक्षल म्हणतात. आता एसआयटी स्थापन करून काय साध्य करणार आहात? असा सवाल संजय राऊत यांनी केला.




मुंबई-गोवा महामार्ग का रखडला?


मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण होईल तेव्हा उद्घाटनाला आपण येणार नाही, कारण मला माझीच लाज वाटतेय इतका उशीर झालाय, असे म्हणत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी उघड नाराजी व्यक्त केली. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, मुंबई-गोवा महामार्ग का रखडला? याची कारणे त्यांनी दिली नाहीत. हे मार्ग रखडले त्याचे कारण ठेकेदारशाही. हे ठेकेदार कोण आहेत? हे ठेकेदार तुमच्याच पक्षातील लोकांचे नातेवाईक आहेत का? मंत्र्यांचे नातेवाईक आहेत का? असा बोचरा सवाल संजय राऊत यांनी केला.




नरेंद्र मोदी कार्यकाळ पूर्ण करणार नाहीत


2029 च्या आधी मोदी पंतप्रधान पदावरून गेलेले असतील. त्याच्यामुळे अमित शहाही नसतील. राज्यात आणि देशात मोठे फेरबदल होतील. अनेक ठिकाणी पडझड होईल. हे चित्र स्पष्ट असून नरेंद्र मोदी हे त्यांचा कार्यकाळ पूर्ण करणार नाही. हे माझे भाकीत नसून मी सत्य स्थिती सांगतोय, असेही यावेळी संजय राऊत म्हणाले.







Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.