Anshuman Vichare Wife Pallavi Reply Trollers: आपल्या हक्काचं घरं असावं, असं प्रत्येकाचंच स्वप्न असतं. काही महिन्यांपूर्वीच मराठी अभिनेता (Marathi Actor) अंशुमन विचारे (Anshuman Vichare) यानं आपल्या हक्काचं घर घेतलं. घर घेतल्यानंतर त्यानं आणि त्याच्या पत्नीनं एक पोस्ट करुन चाहत्यांसोबत आपला आनंद शेअर केलेला. अशातच आता घराचं काम पूर्ण झाल्यानंतर अंशुमन विचारेनं मुलगी आणि पत्नीसोबत एक व्हिडीओ शेअर करुन आपल्या घराची झलक चाहत्यांना दाखवलेली. या व्हिडीओवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलेला. तसेच, अंशुमनच्या पोस्टवर अभिनंदनाचा वर्षावही केलेला. पण, काहींनी अंशुमन विचारेला ट्रोलही केलेलं. अशातच एका ट्रोलरला अंशुमनची पत्नी पल्लवी विचारे (Pallavi Vichare) हिनं सणसणीत उत्तर दिलंय.  


सेलिब्रिटी म्हटलं की, ट्रोलिंग आलंच. पण, कधीकधी ट्रोलर्स मर्यादाच ओलांडतात. थेट कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्यावर भाष्य केलं जातं. अंशुमन विचारेच्या बाबतीतही तेच झालं. नव्या घरातली एक गोष्ट ट्रोलरनं हेरली आणि त्यावरुन थेट अभिनेत्याच्या विचारसरणीवरच बोट ठेवलं. पण, त्यावर अभिनेत्याच्या पत्नीनं संदर्भासहीत स्पष्टिकरण देत ट्रोलरला सुनावलं आहे. यासंदर्भात अंशुमन विचारेची पत्नी पल्लवीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर केलीय.


ट्रोलरला अभिनेत्याच्या पत्नीचं सणसणीत उत्तर, नेमकं घडलं काय? (Pallavi Anshuman Vichare Post)


काही दिवसांपूर्वी अंशुमन विचारेनं सोशल मीडियावर खास व्हिडिओ शेअर करत घर दाखवलं. यावेळी त्याच्या घरात बुद्धांची मूर्ती पहायला मिळाली. ही पोस्ट पाहून एकानं कमेंट केली की, "अंशुमन विचारेने घरात भगवान बुद्धांची मूर्ती बसवली आणि गळ्यात हनुमान. हे काय ओठात एक आणि पोटाट एक. हे करण्याची काय गरज?" असं म्हटलं. 


या कमेंट करणाऱ्याला अंशुमन विचारेच्या पत्नीनं पल्लवीनं चांगलंच सुनावलंय. "कारण अंशुमन तुझ्यासारख्या विचारसरणीचा नाही. म्हणून आमच्या घरात बुद्धांची मूर्ती बसवली आहे. आणि त्याच्यासाठी वेगळं मंदिर सुद्धा केलंय. कारण फक्त बायको बुद्ध आहे तो नाही. त्यामुळे त्यांच्या गळ्यात हनुमान आहेत कारण तो मराठा आहे. आमच्या ओठात आणि पोटात सुद्धा एकच असतं. अंशुमन खूप चांगला मुलगा आहे. तो तुझ्यासारखा भेदभाव करत नाही...", असं सणसणीत उत्तर पल्लवीनं दिलंय.





 


 

 



 

 


View this post on Instagram


 



 

 

 



 

 



 

 

 




 

 







पल्लवी विचारेची पोस्ट जशीच्या तशी... 


जगा आणि जगू द्या... 
किती आणि का हा भेदभाव असावा? आणि खरं तर असे प्रश्नच लोकांच्या मनात का निर्माण व्हावेत, हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे.


डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला, कारण त्यांना त्या धर्मात समता, स्वातंत्र्य आणि माणुसकी दिसली. माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळावा, हीच त्यांच्या विचारांची खरी ताकद होती.


माझा नवरा 96 कुळी मराठा आहे. पण जात, धर्म किंवा पंथाच्या नावावर भेदभाव करणं त्याच्या स्वभावातच नाही. उलट कोणत्याही प्रकारचा भेदभाव त्याला अजिबात आवडत नाही. हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, पारशी, बौद्ध… आणि असंख्य जाती-जमातींची माणसं त्याचे जिवलग मित्र आहेत. त्यांच्या सुख-दुःखात स्वतःच्या माणसासारखा उभा राहणारा, त्यांच्यासाठी काहीही करण्याची तयारी असलेला तो माणूस आहे.


आणि सगळ्यात सुंदर गोष्ट म्हणजे, मी बौद्ध असूनही आमच्यात कधी ह्या गोष्टी ने काहीच फरक पडला नाही माझा नवरा नेहमी बाबासाहेबांच्या जयंती मधे जातो, घोषणा देतो आणि बुद्धाच्या चरणी नतमस्तक होतो, तितक्याच श्रद्धेने जितक्या श्रद्धेने तो स्वामींच्या चरणी डोक ठेवतो...


आमच्या घरात दोन मंदिरं आहेत…
एक त्याचं, एक माझं...
तो माझ्या देवासमोर श्रद्धेने नतमस्तक होतो, मी त्याच्या देवासमोर. आणि आमची लेक तर दोन्ही मंदिरांत तितक्याच प्रेमाने पूजा करते.


कारण आमच्या घरात धर्म वेगळे असले तरी श्रद्धा एक आहे, माणुसकी एक आहे आणि प्रेम त्याहून मोठं आहे.


शेवटी घर भिंतींनी बनत नाही, आणि नातं जात-धर्माने ठरत नाही…
माणसाला माणूस म्हणून स्वीकारण्याची तयारी असेल, तर प्रत्येक धर्माच्या देवाला त्या घरात जागा मिळते.


हीच खरी समता…
आणि कदाचित बाबासाहेबांनी दाखवलेल्या मार्गाचा खरा अर्थही हाच...



Sanjay Dutt U Turn On Marathi Language Statement: 'मस्करी करत होतो, मला चांगलं मराठी येतं...'; मराठी येत नाही, म्हणणाऱ्या संजय दत्तचा आता यूटर्न, प्रताप सरनाईकांना फोन करुन म्हणाला...

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.