व्यापारासोबतच विविध जागतिक मुद्यांवर विचारमंथन
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर यांनी शुक्रवारी नवी दिल्लीत ब्राझीलचे परराष्ट्रमंत्री माउरो व्हिएरा यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी भारत-ब्राझील संबंधांवर तसेच संयुक्त राष्ट्र, जी-20 आणि आंतरराष्ट्रीय सागरी संघटना यांसारख्या मंचांवरील परस्पर सहकार्यावर चर्चा केली. बैठकीदरम्यान, दोन्ही मंत्र्यांनी सध्याच्या जागतिक राजकीय परिस्थितीवर आणि संवाद व मुत्सद्देगिरीला पुढे नेण्यात ब्रिक्स 2026 च्या भूमिकेवरही चर्चा केली.
‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील एका पोस्टमध्ये एस. जयशंकर यांनी या भेटीसंबंधीची माहिती दिली. नवी दिल्लीत ‘ब्रिक्स इंडिया 2026’च्या शुभारंभाच्या निमित्ताने ब्राझीलचे परराष्ट्रमंत्री माउरो व्हिएरा यांना भेटून मला आनंद झाला. आम्ही आमच्या द्विपक्षीय संबंधांवर चर्चा करताना व्यापार आणि गुंतवणूक, संरक्षण, ऊर्जा, कृषी आणि अंतराळ या क्षेत्रांतील सहकार्य वाढवण्याच्या विषयांचा मागोवा घेतला. आम्ही संयुक्त राष्ट्र, जी-20 आणि आयएमओ यांसारख्या विविध बहुपक्षीय मंचांवरील आमच्या सहकार्यावरही चर्चा केली. आम्ही सध्याच्या जागतिक परिस्थितीवर आणि संवाद व मुत्सद्देगिरीला प्रोत्साहन देण्यासाठी ब्रिक्स 2026 च्या महत्त्वावरही विचारांची देवाणघेवाण केल्याचे जयशंकर यांनी स्पष्ट केले.
ब्राझीलचे परराष्ट्रमंत्री माउरो व्हिएरा हे गुरुवारी नवी दिल्लीत दाखल झाले होते. ब्रिक्स शिखर परिषदेत ब्रिक्स सदस्य देश, भागीदार देश आणि विशेष निमंत्रितांचे नेते एकत्र येतील. ब्रिक्समध्ये ब्राझील, चीन, इजिप्त, इथिओपिया, भारत, इंडोनेशिया, इराण, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका आणि संयुक्त अरब अमिराती यांचा समावेश आहे. ब्रिक्सचे भागीदार देश बेलारूस, क्युबा, बोलिव्हिया, कझाकस्तान, मलेशिया, नायजेरिया, थायलंड, युगांडा, उझबेकिस्तान आणि व्हिएतनाम आहेत.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.