ब्रिक्स’ची ताकद वाढल्याचा नरेंद्र मोदींचा दावा : पुतीन यांनी केले पाश्चात्य देशांना लक्ष्य


► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली


दिल्लीत होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषद 2026 ची तयारी पूर्ण झाली असून, जगाचे लक्ष भारतावर केंद्रित झाले आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान दिल्लीत दाखल झाल्यानंतर त्यांनी शुक्रवारी सायंकाळी ‘ब्रिक्स बिझनेस फोरम 2026’च्या संयुक्त व्यासपीठावर उपस्थिती दर्शवली. तत्पूर्वी पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष पुतीन यांची बैठक पार पडली आहे. दरम्यान, पंतप्रधान मोदी आणि पेझेश्कियान यांच्यातही द्विपक्षीय चर्चा झाली आहे. आता शनिवारी दाखल होणाऱ्या चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या सात वर्षांनंतरच्या भारत दौऱ्यावर सर्वांचे लक्ष लागलेले आहे. शनिवारपासून सुरू होणाऱ्या  शिखर परिषदेच्या मुख्य सत्रात व्यापार, ऊर्जा, संरक्षण, संपर्क व्यवस्था आणि जागतिक सहकार्य यांसारख्या मुद्यांवर चर्चा अपेक्षित आहे.


दिल्लीतील ब्रिक्स बिझनेस फोरम 2026 मधील वातावरण विलक्षण होते. पंतप्रधान मोदी, व्लादिमीर पुतीन आणि मसूद पेझेश्कियान यांचे आगमन होताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. तत्पूर्वी इराणचे राष्ट्राध्यक्ष पेझेश्कियान आणि पंतप्रधान मोदी यांच्यात एक विशेष जवळीक दिसून आली. एका छायाचित्रात दोन्ही नेते एकमेकांचा हात धरून उभे असलेले दिसून आले. मुख्य मंचावर येताच पंतप्रधान मोदींनी जागतिक जीडीपीच्या 40 टक्केचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 21-देशीय ब्रिक्स गटाचा गौरव केला. दरम्यान, पुतीन यांनी होर्मुझची नाकेबंदी आणि रशियावर लादलेले निर्बंध पूर्णपणे फेटाळून लावत आक्रमक पवित्रा घेतला. रशिया 10.3 टक्के जीडीपी वाढ आणि विक्रमी 2.3 टक्क बेरोजगारी दरासह पूर्ण जोमात असल्याचे दर्शवणारी आकडेवारी सादर करून पुतीन यांनी खळबळ उडवून दिली. पाश्चात्य निर्बंधांना झुगारून ब्रिक्स नेत्यांनी जगाचा नवा नेता कोण आहे हे स्पष्ट केले.


भारताच्या सामर्थ्यावर मोदींनी टाकला प्रकाश


ब्रिक्स बिझनेस फोरमच्या नेत्यांच्या सत्रात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या ब्रिक्स अध्यक्षपदाची संकल्पना ‘लवचिकता, नावीन्य, सहकार्य आणि शाश्वततेसाठी उभारणी’ ही असल्याचे नमूद केले. गेल्या 12 वर्षांपासून भारताने हा मंत्र आपल्या आर्थिक आणि व्यापार धोरणांचा पाया बनवला आहे. लवचिकतेच्या बाबतीत, भारताने ऊर्जा ते तंत्रज्ञान अशा विविध क्षेत्रांमध्ये पुरवठा साखळ्या अधिक वैविध्यपूर्ण आणि विश्वासार्ह बनवल्या आहेत. या लवचिकतेमुळे भारत जागतिक अनिश्चिततेच्या काळातही विकास आणि स्थिरतेची हमी देतो. आम्ही आमचे रस्ते, रेल्वे, बंदरे आणि विमानतळे वेगाने विस्तारत आहोत. याव्यतिरिक्त आम्ही जहाजबांधणी, सेमीकंडक्टर, क्वांटम तंत्रज्ञान, महत्त्वपूर्ण खनिजे आणि जैवतंत्रज्ञान यांसारख्या धोरणात्मक क्षेत्रांमध्ये नवीन क्षमता विकसित करत आहोत.  भारताच्या युनिफाइड पेमेंट्स इंटरफेसने (यूपीआय) मोठ्या प्रमाणावर आर्थिक समावेशन आणि डिजिटल व्यवहारांना गती दिली आहे. आज, जगातील 50 टक्के रिअल-टाइम पेमेंट्स या तंत्रज्ञानाचा वापर करून केली जात असल्याचे मोदींनी ‘ब्रिक्स फोरम’च्या व्यासपीठावरून जागतिक नेत्यांच्या निदर्शनास आणून दिले.


ब्रिक्सची आर्थिक ताकद दुप्पट वेगाने वाढली : मोदी


ब्रिक्स देशांमध्ये जगाच्या 50 टक्के लोकसंख्या, 40 टक्के जीडीपी आणि जागतिक व्यापारात 25 टक्केपेक्षा जास्त वाटा आहे. शिवाय, या वर्षांमध्ये जागतिक जीडीपी सुमारे अडीचपटीने वाढला असताना ब्रिक्स देशांचा एकत्रित जीडीपी सुमारे साडेचार पटीने वाढला आहे. अर्थातच ब्रिक्सची आर्थिक ताकद उर्वरित जगाच्या तुलनेत जवळपास दुप्पट वेगाने वाढली आहे. ब्रिक्स देश जागतिक नवोपक्रम आणि उपायांसाठी महत्त्वपूर्ण केंद्र म्हणूनही उदयास येत आहेत.  या देशांमध्ये तळागाळातील उपक्रमांपासून ते अत्याधुनिक तंत्रज्ञानापर्यंत नवनवीन शक्यता आकार घेत आहेत. ब्रिक्सची वाढती व्याप्ती, गती आणि अपेक्षा आपल्या सर्वांमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहेत. भारतात आयोजित हा मंच आजपर्यंतचा सर्वात मोठा ब्रिक्स व्यावसायिक मंच असल्याचेही पंतप्रधानांनी नमूद केले.


ब्रिक्सच्या सामर्थ्याचे सहकार्यात रुपांतर : पेझेश्कियान


ब्रिक्स बिझनेस फोरमच्या नेत्यांच्या सत्रात बोलताना इराणचे राष्ट्रपती मसूद पेझेश्कियान यांनी आज जग आपल्या सर्वात कठीण काळातून जात असल्याचे सांगितले. भू-राजकीय अनिश्चितता, पुरवठा साखळीतील व्यत्यय आणि राजकीय दबाव आणण्यासाठी आर्थिक साधनांचा वाढता वापर यामुळे देशांच्या आर्थिक वातावरणात आणखी गुंतागुंत निर्माण झाली आहे. ब्रिक्सची खरी ताकद केवळ सदस्य अर्थव्यवस्थांच्या आकारापुरती मर्यादित नाही, तर जेव्हा या क्षमतांचे व्यापार, गुंतवणूक आणि संयुक्त वित्तपुरवठ्याच्या जाळ्यांमध्ये रुपांतर होते, म्हणजेच संभाव्य सहकार्याकडून प्रत्यक्ष, कार्यात्मक सहकार्याकडे वाटचाल होते, तेव्हा ती अधिक स्पष्टपणे दिसून येते, असे ते म्हणाले.


Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.