बातमी शेअर करा :


































सामनाचे अनुसरण करा






अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात लोअर मॅनहॅटन येथील स्प्रिंग स्ट्रीट सबवे स्टेशनवर एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. स्टेशनच्या रेल्वे रुळांवर बसणे दोन उच्चशिक्षित तरुणांच्या जीवावर बेतले आहे. वेगाने आलेल्या ट्रेनच्या धडकेत हिंदुस्थानी वंशाची तरुणी मलाईका चित्रे (वय – 24) आणि तिचा नेपाळी-अमेरिकन मित्र नवम कौल (वय – 25) या दोघांचाही चिरडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी पहाटे सुमारे 3 वाजून 15 मिनिटांनी घडल्याची माहिती ‘द न्यूयॉर्क पोस्ट’ने न्यूयॉर्क पोलीस विभागाच्या हवाल्याने दिली आहे.


मलाईका चित्रे (रा. डेटन, न्यू जर्सी) आणि नवम कौल (रा. सेरेविले, न्यू जर्सी) हे दोघे स्प्रिंग स्ट्रीट सबवे स्टेशनच्या डाऊनटाऊन नंबर 4 ट्रेनच्या रुळांवर शांतपणे बसलेले होते. याच वेळी डाऊनटाऊनच्या दिशेने वेगाने येणाऱ्या ट्रेनच्या मोटरमनने दोघांना रुळावर बसलेले पाहिले. त्यांनी तत्काळ इमर्जन्सी ब्रेक मारून ट्रेन थांबवण्याचा प्रयत्न केला; मात्र ट्रेनचा वेग जास्त असल्याने ती वेळेत थांबली नाही आणि दोघांनाही उडवत पुढे निघून गेली.


घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ट्रेनच्या तिसऱ्या आणि चौथ्या डब्याखालून दोघांचेही छिन्नविच्छिन्न मृतदेह बाहेर काढण्यात आले. अपघातानंतर ट्रेनमधील सुमारे 100 प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढून प्लॅटफॉर्मवर हलवण्यात आले.


दरम्यान, या घटनेचा एका प्रत्यक्षदर्शीने काढलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये दोघेही ट्रेन येण्याच्या काही सेकंद आधी रुळांवर शांतपणे बसलेले दिसत आहेत. मलाईका चित्रे ही हसत होती आणि ती नवमला स्वतःकडे ओढत रुळांवर बसली होती. सुरुवातीला दोघांपैकी एकजण रुळांवर पडला असावा आणि त्याला वाचवण्यासाठी दुसरा खाली उतरला असावा, असा अंदाज होता; परंतु व्हायरल व्हिडिओ आणि पोलिसांच्या तपासात दोघेही स्वतःहून रुळांवर बसल्याचे स्पष्ट होत आहे.


मलाईका आणि नवम हे दोघेही न्यू जर्सी येथील नामांकित रुटगर्स युनिव्हर्सिटीचे माजी विद्यार्थी होते. मलाईका हिने मे 2024 मध्ये पदवी पूर्ण केली होती आणि ती अकाडिया फार्मास्युटिकल्स’मध्ये ऑपरेशन्स स्पेशलिस्ट म्हणून कार्यरत होती. तर नवम याचे कुटुंब सुमारे 30 वर्षांपूर्वी नेपाळमधून अमेरिकेत स्थायिक झाले होते. तो ब्लूमबर्ग या प्रसिद्ध कंपनीत फायनान्शियल डेटा अनालिस्ट म्हणून काम करत होता.







Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.