येमेनमधील इराण समर्थित हुथी बंडखोर आणि सौदी अरेबियातील संघर्ष टोकाला पोहोचला आहे. हुथी बंडखोरांनी सौदी अरेबियाच्या पश्चिम किनारपट्टीवरील भागांना लक्ष्य केले आहे. त्यानंतर मुस्लिमांचे पवित्र शहर मक्का, जिद्दा आणि ताईफमध्ये काही काळासाठी हवाई हल्ल्याचा अलर्ट जारी करण्यात आलात. विशेष म्हणजे मक्का शहराच्या इतिहासामध्ये सुरक्षेच्या कारणस्ताव असा इशारा देण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे सौदी अरेबियामध्ये खळबळ उडाली आहे. ‘इंडिया टुडे‘ने याबाबत वृत्त दिले आहे.


मक्का शहराच्या प्रतिबंधित हवाई हद्दीत प्रवेश करण्यापूर्वी हुथी बंडखोरांचे एक ड्रोन सौदी अरेबियाच्या हवाई सुरक्षा प्रणालीने नष्ट केले. या घटनेनंतर खबरदारीचा उपाय म्हणून मदिना येथील प्रिन्स मोहम्मद बिन अब्दुलअजीज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील विमान वाहतूक काही काळासाठी थांबवण्यात आली होती. दुसरीकडे मक्का शहराला लक्ष्य केल्याचा आरोप हुथी बंडखोरांनी फेटाळून लावला आहे.


मक्केला लक्ष्य केल्याचे सौदीचे दावे हा एक जुनाट बनाव असून आता यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही, असे हुथी नेते हाझेम अल-असाद यांनी सांगितले. तर हुथींचे लष्करी प्रवक्ते साह्या यारी यांनी सौदी अरेबियाचे एक लढाऊ विमान पाडल्याचा दावा केला. येमनच्या मारिब प्रांतात कारवाई करणाऱ्या सौदी अरेबियाच्या F-15 लढाऊ विमानाला स्थानिक बनावटीच्या क्षेपणास्त्राने हवेतच पाडले आहे, असा दावा साह्या यारी यांनी केला. तसेच सौदी अरेबियाने येमनमध्ये गेल्या काही दिवसांत तब्बल 450 हून अधिक हवाई हल्ले केल्याचा आरोपही त्यांनी केला.


मुस्लिम देशांच्या संघटनेचा संताप


57 मुस्लिम देशांची संस्था असलेल्या ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशनने या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. दोन पवित्र मशिदी मक्का आणि मदिना व तेथील यात्रेकरूंची सुरक्षा ही आमची रेड लाईन आहे. हुथींच्या या दुसाहसाला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी आम्ही मागे हटणार नाही, असे ओआयसीचे प्रवक्ते तुर्की अल-मालिकी म्हणाले. तर दुसरीकडे कतारचे परराष्ट्र व्यवहार अधिकारी इब्राहिम अल हाश्मी यांनी बाब अल-मंदाब जलसामुद्रधुनी बंद होण्याच्या धोक्यावर इशारा दिला असून, हा मार्ग बंद झाल्यास संपूर्ण जगासाठी ते विनाशकारी ठरेल असे म्हटले आहे.




संघर्ष तीव्र झाला


दरम्यान, गेल्या काही दिवसांत हुथी बंडखोरांनी सौदी अरेबियावर आतापर्यंतचा सर्वात मोठा क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ला चढवला आहे. या हल्ल्यांमुळे अनेक तेल प्रकल्पांना भीषण आग लागली असून किमान 13 नागरिक जखमी झाले आहेत. खमीस मुशैत येथील किंग खालिद एअरबेसवर हुतींनी डझनभराहून अधिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी हल्ला केल्याचा दावा केला आहे. तसेच जुलै महिन्यापासून हुथी बंडखोरांनी सौदीच्या जहाजांवर लाल समुद्रात हल्ले सुरू केले असून पूर्ण सागरी नाकेबंदी जाहीर केली आहे.



Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.