मुंबई : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मराठा नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil)  गेल्या 19 दिवसांपासून उपोषण करत आहेत. मनोज जरांगे पाटील हे मुंबईत आंदोलन करण्यासाठी मंगळवारी अंतरवाली सराटीवरुन निघाले होते. काल त्यांचा मुक्काम बीडच्या (Beed news) पाटोदा येथे होता. अद्यापपर्यंत मनोज जरांगे यांना मुंबईमध्ये आंदोलनासाठी परवानगी मिळालेली नाही, परवानगीसाठी प्रयत्न सुरू असतानाच जरांगे मुंबईकडे निघाले आहे, तर दुसरीकडे आझाद मैदानात आंदोलन करणाऱ्या मराठा आंदोलकांची पोलिसांनी माहिती मागितली आहे. जे 50 आंदोलक आंदोलन करणार आहे, त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर आणि डिटेल्स पोलिसांनी मागवले आहेत.


त्याचबरोबर हे ५० आंदोलक हे कोणत्या वाहनातून येणार आहे, त्या वाहनांची डिटेल्स ही पोलिसांनी मागितली आहे. आंदोलनाला कोण पन्नास लोक असणार हे मनोज जरांगे पाटील ठरवणार आहेत, त्यानंतर आझाद मैदान पोलीस स्टेशनला ही सर्व माहिती दिली जाणार, ही माहिती दिल्यानंतर पोलीस आंदोलनाला परवानगी देणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.


तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदानात उपोषण करण्याच्या परवानगीच्या संदर्भातील कोणतीही याचिका अद्याप मुंबई उच्च न्यायालयात दाखल नाही. तातडीच्या सुनावणी अंतर्गत परवानगीबाबत याचिका दाखल करण्याची शक्यता आहे. मात्र दुसरीकडे मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी प्रमुख सरकारी वकील शिशिर हिरे यांच्या भेटीसाठी हायकोर्टात दाखल झाले आहेत. पोलिसांकडून आंदोलनाला परवानगी का नाकारली आहे? आणि या आंदोलनाला परवानगी का देण्यात येऊ नये याबाबतच मत सरकारी वकील शिशिर हिरे यांना मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी सांगणार आहेत. मुंबई पोलिसांनी या अगोदर २ वेळा या आंदोलनाला परवानगी नाकारली आहे, त्याविरोधात मराठा आंदोलनातील नेत्यांकडून उच्च न्यायालयात आज शक्यता आहे. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे राज्य सरकार आणि मुंबई पोलीस यांच लक्ष लागलं आहे.


सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गणेशोत्सवाच्या काळामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला आझाद मैदानावर परवानगी मिळालेली नाही. गणेशोत्सवाच्या दरम्यान कोणत्याही प्रकारच्या आंदोलनाला पोलिसांकडून परवानगी देण्यात आलेली नाही. या काळात आंदोलनास परवानगी दिल्यास कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न उद्भवू शकतो, तसेच मुंबई आणि पुणे या दोन्ही शहरांमध्ये पोलिसांवर अतिरिक्त ताण पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे जरांगे यांना आंदोलनाची परवानगी गणेशोत्सवानंतर दिली जाऊ शकते. जरांगे यांच्याकडून मागील वर्षी केलेल्या आंदोलनादरम्यान वारंवार अटी व शर्तींचे उल्लंघन करण्यात आले होते. सलग तीनदा गणेशोत्सवामध्येच आंदोलन केल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. याच पार्श्वभूमीवर दोनदा अर्ज करूनही पोलिसांकडून त्यांना परवानगी नाकारण्यात आली आहे. हे प्रकरण कोर्टात गेल्यास पोलीस प्रशासनाकडून आपली अधिकृत भूमिका मांडली जाईल आणि कोर्टाच्या निर्देशानुसारच पुढील कारवाई केली जाईल. दरम्यान, जर कोर्टाने गणेशोत्सव काळात आंदोलनाला परवानगी दिलीच, तर पोलीस यंत्रणा पूर्णपणे सज्ज ठेवण्यासाठी मुंबई पोलिसांकडून पूर्वतयारी आणि आढावा घेण्यात आला आहे. याशिवाय, अतिरिक्त पोलीस कुमक तैनात करणे आणि वाहतूक व्यवस्थेवर येणारा ताण हाताळणे या संदर्भातही प्रशासनाकडून आवश्यक ती तयारी सुरू करण्यात आली आहे.


Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.