बातमी शेअर करा :


































सामनाचे अनुसरण करा






एक हजार मच्छीमार बोटी उभ्या करण्याची क्षमता असलेल्या करंजा बंदरातील गाळाचे ‘विघ्न’ कायमचे दूर होणार आहे. मच्छीमारांच्या संतापानंतर खडबडून जाग आलेल्या सरकारने १३६ कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी दिली असून या बंदरातील गाळ युद्ध पातळीवर काढण्यात येणार आहे. त्याबरोबरच ३७० मीटर अतिरिक्त लांबीच्या धक्काभिंतीसह अन्य महत्त्वाची विकासकामे या ठिकाणी केली जाणार आहेत. येत्या दोन महिन्यांत निविदा काढून या कामाचा श्रीगणेशा केला जाणार आहे. त्यामुळे रायगडातील हजारो मच्छीमारांना गणपती बाप्पाच पावला आहे.


रायगड जिल्ह्यातील हजारो मच्छीमारांसाठी महत्त्वाचे असलेले करंजा मच्छीमार बंदर तीन वर्षांपूर्वी कार्यान्वित झाले आहे. तेव्हापासून या करंजा मच्छीमार बंदरातून मासेमारी हंगामात सुमारे ५५० कोटींची मासळीची निर्यात होत आहे. मात्र अद्ययावत करंजा मच्छीमार बंदर मागील दोन वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर साचलेल्या गाळाच्या समस्येमुळे अडचणीत आले आहे. गाळाच्या समस्येमुळे मच्छीमारांना ओहोटीच्या वेळी बंदरात मासळी उतरवताना आणि बंदरातून मासळी उतरवून पुन्हा बाहेर जाण्यासाठी बंदराबाहेरच पाच ते सहा तास वाट पाहावी लागते. बंदरात आणि बंदराबाहेर शेकडो बोटी गाळात अडकून पडत होत्या. मात्र ही कटकट आता कायमची निकाली निघणार आहे. करंजा मच्छीमार संस्था व मच्छीमारांकडून करण्यात आलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. मच्छीमारांच्या समस्या दूर करण्यासाठी बंदरातील विविध २१ कामांसाठी १३६.७६ कोटी रुपये खर्चाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे, अशी माहिती मत्स्यव्यवसाय विभागाचे सहआयुक्त महेश देवरे यांनी दिली.


ही होणार कामे
बंदरातील काँक्रिटीकरण, लिलाव केंद्र ४, प्रशासकीय भवन, संपर्कासाठी रेडिओ भवन, उपाहारगृह, सुरक्षा कक्ष, कंपाऊंड वॉल, सेव्हरेज ट्रिटमेंट प्लाण्ट, बर्फ फॅक्टरी, १०० टन क्षमतेचे कोल्ड स्टोरेज, पाणीपुरवठा, ड्रेनेज, सेव्हरेज सिस्टीम, डिझेल पंप आदी कामांसाठी ८८ कोटी ७५ लाख ४७ हजार ७३६ रुपये खर्च करण्यात येणार आहे.


१८ महिन्यांची मुदत
निविदा प्रक्रियेनंतर येत्या नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यापासून या कामाला सुरुवात होणार आहे. वर्कऑर्डर दिल्यानंतर १८ महिन्यांच्या मुदतीत काम पूर्ण होणार आहे, अशी माहिती एमएफडीसीचे अभियंता नीरज शिंदे यांनी दिली. मुख्यतः मच्छीमारांना भेडसावणारा बंदरातील साचत असलेला गाळ व अतिरिक्त धक्काभिंतींची समस्या दूर होणार असल्याने रायगडच्या हजारो मच्छीमारांना गणपती बाप्पा पावला असल्याच्या भावना मच्छीमारांकडून व्यक्त केल्या जात आहेत.







Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.