म. टा. वृत्तसेवा, सटाणा : खासगी क्लासच्या गणपती विसर्जनासाठी बंधाऱ्यावर गेलेल्या विद्यार्थ्यांपैकी दोघांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना बागलाण तालुक्यातील नामपूर येथे घडली. अथर्व दीपक पगार (वय १७, रा. उत्तराणे) आणि प्रसाद दादाभाऊ वाघ (वय १७, रा. नामपूर) अशी त्यांची नावे आहेत. या घटनेने नामपूरसह परिसरात शोककळा पसरली आहे.
नामपूर येथील एका खासगी क्लासमधील बारावीचे काही विद्यार्थी दुपारच्या सुमारास गणपती विसर्जनासाठी मोसम नदीवरील बंधाऱ्यावर गेले होते. या वेळी अथर्व आणि प्रसाद हे दोघे पाण्यात उतरले असता बुडू लागले. उपस्थितांनी त्यांच्या बचावासाठी प्रयत्न केले; मात्र पाण्याची खोली अधिक असल्याने त्यांना बाहेर काढता आले नाही. परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. त्यानंतर मालेगाव येथील बचाव पथकाला पाचारण करण्यात आले. बचाव पथकाने शोधमोहीम राबवून दोन्ही विद्यार्थ्यांना पाण्यातून बाहेर काढले; मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. मृतदेह पुढील वैद्यकीय प्रक्रियेसाठी नामपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अथर्वचे वडील कमलाकर पगार यांनी दिलेल्या जबाबात क्लास संचालक विवेक अशोक पाटील यांनी पालकांची परवानगी न घेता विद्यार्थ्यांना गणपती विसर्जनासाठी नेल्याचा आरोप केला आहे. या वेळी क्लासमधील दोन शिक्षिका आणि दहा ते पंधरा विद्यार्थी सोबत असल्याचेही जबाबात नमूद केले. क्लासचालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली.
तर दुसऱ्या एका घटनेत, शिंदे येथे लेकीच्या घरी औषधोपचारासाठी आलेल्या वडिलांचा विहिरीत पडून पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. संपत गणपत आवारे (वय ८०, रा. खेरवाडी, ता. निफाड) असे मृताचे नाव आहे. संपत आवारे हे आजारी असल्याने शिंदे गावात वास्तव्यास असलेल्या आपल्या लेकीच्या घरी वैद्यकीय उपचारासाठी आले होते. गुरुवारी दुपारी सव्वादोन वाजेच्या सुमारास ते शिंदे गावातील तुंगार गल्लीपासून जवळच असलेल्या डॉ. विलास बोराडे यांच्या विहिरीत पडले. शेतात पाणी भरण्यासाठी गेलेले संजय काकड यांना संपत आवारे विहिरीत पडलेले दिसून आले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांना बाहेर काढून महापालिकेच्या बिटको रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.