मुंबई : मुंबईत गेल्या काही वर्षांत अनधिकृत झोपड्यांचे इमले वाढले असून, दुमजली, तीन मजली आणि त्याहून अधिक मजली झोपड्यांचे पेव फुटले आहे. या बेकायदा बांधकामांविरोधात मुंबई महापालिकेने आता कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. १४ फुटांपेक्षा अधिक उंचीच्या झोपड्यांवर कारवाई करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असून, एकूण ३४ हजार ५२७ अनधिकृत झोपड्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे.




मुंबई महापालिका १ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर २०२६पर्यंत झोपडपट्टी परिसरातील अनधिकृत बांधकामाविरोधात विशेष मोहीम राबवणार आहे. झोपडपट्टी क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांमध्ये वास्तव्यास असलेल्या नागरिकांनी ही बांधकामे स्वत:हून पाडावीत, अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापालिकेने दिला आहे.




मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये एकूण २ लाख २३ हजार १५० झोपड्या आहेत. त्यापैकी ३९ हजार १११ झोपड्या १४ फूट आणि त्यापेक्षा अधिक उंचीच्या असल्याचे निर्दशनास आले आहे. यापैकी ३ हजार ३४८ झोपड्या शहर विभाग, ४ हजार ५३६ झोपड्या पश्चिम उपनगरे आणि ३१ हजार २२७ झोपड्या पूर्व उपनगरांत आहेत.




मुंबईतील अनधिकृत बांधकामांविरोधात महापालिकेच्या विविध वॉर्डकडून सातत्याने कारवाई सुरू आहे. २४ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत एकूण १२८ अनधिकृत बांधकामांवर पाडकामाची कारवाई करण्यात आली. १४० अनधिकृत बांधकामांविरोधात कारवाई नियोजित आहे. नागरिकांनी अनधिकृत बांधकामे करू नयेत, अशा प्रकारची बांधकामे केल्यास ती स्वतःहून तत्काळ हटवावीत, अन्यथा त्यांच्यावर कारवाईचा इशारा मुंबई महापालिकेने दिला आहे.




याआधीही पाडकाम, नोटिसा


याआधी ४,५८४ झोपड्यांवर पाडकामाची करवाई करण्यात आली आहे, तर ६११ झोपड्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. उर्वरित झोपड्यांमध्ये वास्तव्यास असलेल्या रहिवाशांनी संबंधित बांधकामे स्वतःहून तत्काळ पाडावीत, अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.



२,२३,१५०- मुंबई शहर आणि उपनगरांतील एकूण झोपड्या



३९,१११- चौदा फुटांपेक्षा उंचीच्या झोपड्यांची संख्या

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.