प्रसाद रानडे, रत्नागिरी : संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकावर चार साप्ताहिक एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळावा, या मागणीसाठी गणपती बाप्पांचे वाहन असलेल्या ‘उंदीरमामा’च्या माध्यमातून अनोख्या पद्धतीने रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. यावेळी स्टेशन मास्तरांकडे असलेल्या तक्रार वहीत या मागणीची नोंद करण्यात आली. १०११५/१०११६ बांद्रा–मडगाव एक्सप्रेस, १६३११/१६३१२ श्री गंगानगर एक्सप्रेस, १२९७७/१२९७८ अजमेर–एर्नाकुलम एक्सप्रेस आणि ०२१९७/०२१९८ जबलपूर–कोयंबतूर एक्सप्रेस या चार साप्ताहिक गाड्यांना संगमेश्वर रोड स्थानकावर थांबा मिळावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. निसर्गरम्य चिपळूण आणि संगमेश्वर फेसबुक रेल्वे ग्रुप या सोशल मीडिया ग्रुपकडून हे अनोख आंदोलन करण्यात आलं.




गणेशोत्सवानिमित्त मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणात दाखल झाले आहेत. आता मुंबईसह अन्य शहरांकडे परतीचा प्रवास सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर संगमेश्वर रोड स्थानकावर प्रवाशांची वाढती गरज लक्षात घेऊन विविध महत्त्वाच्या गाड्यांना थांबे मिळावेत, अशी मागणी सातत्याने केली जात आहे.




चारही रेल्वे गाड्यांना थांबा देण्याची मागणीचारही गाड्यांना संगमेश्वर रोड येथे थांबा मिळाल्यास संगमेश्वर तालुक्यासह परिसरातील प्रवाशांना मुंबई, राजस्थान, उत्तर भारत, केरळ, मध्य प्रदेश आणि दक्षिण भारतातील विविध भागांकडे प्रवासासाठी सुविधा उपलब्ध होणार आहे.




रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची मागणी आणि संगमेश्वर रोड स्थानकावरील प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन या चारही साप्ताहिक एक्सप्रेस गाड्यांना लवकरात लवकर थांबा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. ‘उंदीरमामा’च्या माध्यमातून करण्यात आलेल्या या अनोख्या तक्रारीची रेल्वे स्थानक परिसरात चर्चा रंगली.




मुख्यमंत्र्यांचे केंद्रीय रेल्वेमंत्र्यांना पत्रकोकण रेल्वे मार्गावरील या चार महत्त्वाच्या ट्रेन संगमेश्वर येथे थांबावेत यासाठी कोकण रेल्वे प्रशासनाकडून भारतीय रेल्वे बोर्डाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे इतकेच नाही तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही केंद्रीय रेल्वेमंत्र्यांना या संदर्भात पत्र लिहिले आहे मात्र याबाबत अद्याप कोणताही निर्णय न झाल्याने हे अनोख आंदोलन करण्यात आल्याची माहिती कार्यकर्ते संदेश जिमण यांनी माध्यमांजवळ बोलताना दिली.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.