श्रीकृष्ण पांचाळ, पुणे : पुणे जिल्ह्यातील देहूगावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तीन महिन्यांच्या गर्भवती पत्नीच्या गळ्यावर धारदार हत्याराने वार करून तिची हत्या केल्यानंतर पतीनेही आत्महत्येचा प्रयत्न केला. आरोपी पतीने आधी स्वतःच्या शरीरावर ब्लेडने वार केले आणि त्यानंतर दुसऱ्या मजल्यावरून उडी मारली. या घटनेत त्याच्या पायाला फ्रॅक्चर झाले असून, तो गंभीर जखमी झाला आहे. सध्या त्याच्यावर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मृत महिलेचे नाव शुभांगी आकाश बारसकर (वय 28 वर्षे) असे आहे. तर आरोपी पतीचे नाव आकाश रामदास बारसकर (वय 31 वर्षे) असे आहे. आकाश हा मूळचा अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील वाघा गावचा रहिवासी आहे. तो आयटी इंजिनिअर असून, पुण्यातील हिंजवडी परिसरातील एका मोठ्या कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करत होता. सध्या तो देहूगावमध्ये भाड्याच्या खोलीत राहत होता.
पोलिसांत दाखल झालेल्या तक्रारीनुसार, 20 सप्टेंबर रोजी पहाटे साडेचार ते साडेपाचच्या दरम्यान देहूगावातील रामचंद्र यदु राऊत यांच्या भाड्याच्या खोलीत ही घटना घडली.
आकाशने पत्नीला का संपवलं?आकाशने काही महिन्यांपूर्वी गावात शेतीची जमीन खरेदी केली होती. मात्र, पत्नी शुभांगीचा या जमिनीला विरोध होता. जमीन खरेदीसाठी लागणाऱ्या पैशांवरूनही दोघांमध्ये वाद होत असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. शुभांगीला पुण्यातच प्रॉपर्टी खरेदी करायची होती, तर आकाशने गावात जमीन घेतल्याने दोघांमध्ये मतभेद वाढले होते.
घटनेच्या दिवशी पहाटे याच मुद्द्यावरून पती-पत्नीमध्ये वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर आकाशने धारदार हत्याराने शुभांगीच्या गळ्यावर वार केल्याचा आरोप आहे. गंभीर जखमी झाल्याने शुभांगीचा मृत्यू झाला.
आकाशचा स्वत:ला संपवण्याचा प्रयत्नपत्नीची हत्या केल्यानंतर आकाशने स्वतःच्या शरीरावर ब्लेडने वार केले. त्यानंतर त्याने दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, या घटनेत त्याच्या पायाला फ्रॅक्चर झाले असून तो गंभीर जखमी झाला आहे.
शुभांगीच्या वडिलांकडून तक्रारघटनेची माहिती मिळताच देहूरोड घटनास्थळी धाव घेतली. शुभांगीचे वडील सतीश मारुती काईत (वय 56 वर्षे) यांच्या तक्रारीवरून आकाश रामदास बारसकर याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 103(1) अंतर्गत हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून हत्येसाठी वापरण्यात आलेले धारदार हत्यार, तसेच इतर पुरावे ताब्यात घेतले असून, पती-पत्नीमधील वाद आणि हत्येमागील नेमक्या कारणांचा तपास सुरू आहे.
पोलिसांची प्रतिक्रिया काय?देहूरोडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी सांगितले की, “काल सकाळी आकाश बारसकर नावाचा व्यक्ती जखमी अवस्थेत पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. तपासात आकाशने आपल्या पत्नीच्या गळ्यावर चाकूने वार करून तिची हत्या केल्याचे समोर आले. त्यानंतर त्याने स्वतःच्या शरीरावर ब्लेडने वार केले आणि आत्महत्येचा प्रयत्न करण्यासाठी दुसऱ्या मजल्यावरून उडी मारली. या प्रकरणात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे."

"सुमारे पाच ते सहा महिन्यांपूर्वी आकाशने गावात जमीन खरेदी केली होती. त्याला त्याच्या पत्नीचा विरोध होता. पत्नीला पुण्यातच प्रॉपर्टी खरेदी करायची होती. याच कारणावरून दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून किरकोळ वाद सुरू होते. आकाश हा आयटी इंजिनिअर म्हणून काम करत होता”, अशी माहिती त्यांनी दिली.
आरोपीवर उपचार सुरुसध्या आरोपी आकाशवर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू असून, त्याची वैद्यकीय स्थिती पाहून पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. तीन महिन्यांच्या गर्भवती पत्नीची हत्या आणि त्यानंतर पतीने केलेला आत्महत्येचा प्रयत्न यामुळे देहूगाव परिसरात खळबळ उडाली आहे. या हत्येमागील नेमके कारण आणि संपूर्ण घटनाक्रम पोलिसांच्या पुढील तपासातून स्पष्ट होणार आहे.