सुधीर पाटील, सातारा : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सातारा जिल्हाध्यक्ष, माजी सहकार मंत्री आणि सह्याद्री कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब पाटील यांनी बॉयलर अग्निप्रदीपन कार्यक्रमात बोलताना कारखान्याच्या वार्षिक सभेत गोंधळ घालणाऱ्या भाजपच्या दोन्ही आमदारांचा चांगलाच समाचार घेतला. 'मुक्तपणे फिरणाऱ्या सह्याद्रीच्या वाघांना कशाची भीती? कोणी अंगावर येईल तेव्हा बघू', अशा शब्दांत बाळासाहेब पाटील यांनी भाजपच्या दोन्ही आमदारांना थेट आव्हान दिले.




माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांनी आक्रमक भाषण केलं. "सह्याद्री कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत प्रश्नोत्तरं व्हायची. पूर्वी तीन-तीन तास सभा चालायची. मात्र, यंदा काही लोकांना कारखान्याची सभा सुरळीत होऊ द्यायची नव्हती. डोळे काढेन, हात काढेन, अशी प्रक्षोभक भाषणं केली. आपण एका मर्यादेपर्यंत संयम ठेवला. अंगावर आल्यावर आपण बघूच. कारण, तुम्ही सर्व सह्याद्रीचे वाघ आहात. तुम्हाला कशाची भीती. तुम्ही मुक्तपणे फिरता. योग्य वेळी मी त्यांना उत्तर देईन", असा सूचक इशारा बाळासाहेब पाटील यांनी भाजपा आमदारांना दिला.




बाळासाहेब पाटील काय म्हणाले?सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या बॉयलर अग्नी प्रदीपन कार्यक्रमानंतर झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. "आपण संयम ठेवला पाहिजे. आपल्याला संस्था चालवायची आहे. पुढे जायचे आहे", असा कार्यकर्त्यांना सल्ला देऊन बाळासाहेब पाटील म्हणाले की, "यंदा सह्याद्री कारखाना पूर्ण क्षमतेने चालविणार आहोत. प्रतिदिन 11 हजार टनापेक्षाही अधिक गळीत आपण करणार आहोत. कारखान्याची यंत्रणा सक्षम झाल्यामुळेच विरोधकांना असुया निर्माण झाली असावी, अशी मला शंका आहे."




बाळासाहेब पाटील यांचे आरोप"माजी मंत्री संपतराव देशमुख, अनिल बाबर, माजी आमदार मोहनराव कदम हे देखील कारखान्याचे सभासद होते. ते वार्षिक सभेत व्यासपीठावर येऊन बसायचे. दिवंगत लालासाहेब यादव, आनंदराव जाधव, विठ्ठलतात्या जाधव, राजाभाऊ देशपांडे यांच्यासारखे ज्येष्ठ सभासद वार्षिक सभेत प्रश्न विचारायचे. त्यांच्यासाठी स्वतंत्र मंडप आणि माईकची व्यवस्था केली जायची. तीन-तीन तास सभा चालायची. त्या परंपरेला यंदा छेद देण्याचा प्रयत्न झाला. याचा अर्थ एकच आहे की उत्तरे तुम्हाला ऐकायची नव्हती. सह्याद्रीसारख्या एका उत्तुंग कारखान्यावर काहीतरी आरोप करायच, अशा प्रकारची विरोधकांची वृत्ती होती", असा आरोप बाळासाहेब पाटील यांनी केला.




सरकार तुमचं, लावा चौकशी, बाळासाहेब पाटील यांचं आव्हान"एसआरआयमध्ये कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील 30 हजार मते कमी झाली. त्याचे शल्य त्यांच्या मनात आहे. माझ्यावर वैयक्तिक आरोप करून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा प्रयत्न केला. निवडणूक अर्जासोबतच्या शपथपत्रात मी माझ्या संपत्तीचा तपशील दिलेला आहे. सरकार तुमचं आहे, म्हणता तर मग लावा माझी चौकशी", असं थेट आव्हान बाळासाहेब पाटील यांनी भाजपा आमदार मनोज घोरपडे आणि धैर्यशील कदम यांना दिलं.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.