लखनऊ: गणपती विसर्जन मिरवणुकीतील डीजेच्या मोठ्या आवाजानं शाळेच्या वर्गात बसलेल्या एक विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. इयत्ता दुसरीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीच्या मृत्यूचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. या हृदयद्रावक घटनेनंतर परिसरात आक्रोश आहे. विविध सामाजिक आणि धार्मिक संघटनांनी डीजेचा वापर रोखण्याची मागणी केली आहे.






उत्तर प्रदेशच्या बलरामपूर नगरमधील एका खासगी शाळेत इयत्ता दुसरीची विद्यार्थिनी वैष्णवी मिश्रा तिच्या वर्गात अभ्यास करत होती. तितक्यात शाळेच्या शेजारी असलेल्या रस्त्यावरून गणेश विसर्जन मिरवणूक जाऊ लागली. त्यात मोठ्या आवाजात डीजे वाजत होता. तो आवाज असह्य झाल्यानं वर्गात बसलेली वैष्णवी बाकावरून खाली पडली. तिची शुद्ध हरपली. बेशुद्ध पडलेल्या वैष्णवीला शाळेच्या शिक्षकांनी तातडीनं रुग्णालयात नेलं. पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.






वैष्णवीच्या वर्गातील सीसीटीव्हीमधील फुटेज समोर आलं आहे. त्यात वर्गात तिच्या बाकावर बसलेली वैष्णवी शुद्ध हरपून पडताना दिसत आहे. डीजेचा दणदणाट चिमुकल्या वैष्णवीच्या जीवावर बेतला. तिच्या मृत्यूनंतर डीजे लावणाऱ्या गणेशोत्सव मंडळाविरोधात आक्रोश उफाळून आला आहे. अनेक सामाजिक आणि धार्मिक संघटनांनी डीजेवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. सर्वोच्च न्यायालयानं ध्वनी यंत्र वाजवण्यासाठी नियमांची चौकट घालून दिली आहे. पण न्यायालयानं दिलेल्या नियमावलीचं सण उत्सव काळात सर्रास उल्लंघन होतं.






मुलीच्या मृत्यूची माहिती मिळाली असून या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचं पोलीस अधिकारी अभिषेक सिंह यांनी सांगितलं. मुलीच्या कुटुंबियांनी अद्याप तरी कोणतीही तक्रार दिलेली नसल्याची माहिती त्यांनी दिली. निष्पाप मुलीच्या मृत्यूनंतर नगर पालिका प्रशासनानं कठोर पाऊल उचललं आहे. येऊ घातलेल्या दुर्गा पूजा उत्सवासह कोणत्याही धार्मिक उत्सवात डीजेच्या वापरावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.






बलरामपूर नगरपालिकेचे चेअरमन डॉ. धीरेंद्र प्रताप सिंह धीरू यांनी मंगळवारी विविध धार्मिक आणि सामाजिक संघटनांची बैठक घेतली. त्यात सर्वसंमतीनं डीजे बंदीचा निर्णय घेण्यात आला. कोणत्याही व्यक्तीनं, मंडळानं, संघटनेनं डीजे वाजवला तर त्या विरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.