सुशील राऊत, ​छत्रपती संभाजीनगर : बँकेतील महिलांच्या हाणामारीची घटना समोर आली आहे. बँकेत फॉर्म भरत असताना झालेल्या क्षुल्लक वादाचे रूपांतर तुफान हाणामारीत झाले. या हाणामारीत एका महिलेने दुसऱ्या महिलेच्या डोक्यावर थेट स्टॅप्लरने वार केला. यामध्ये महिला गंभीर जखमी झाली आहे. सिडको परिसरातील बजरंग चौक येथील एका बँकेत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी रूपाली ब्राह्मणे या महिलेविरुद्ध सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




रूपाली ब्राह्मणे (वय ३४, रा. आंबेडकर नगर, गल्ली नं. ५) असे हल्ला करणाऱ्या महिलेचे नाव आहे. तर रुख्मीन अशोक भगुरे (वय ३३) आंबेडकर नगर गल्ली नंबर 5 असे फिर्यादी महिलेचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुख्मीन भगुरे (वय ३३) या २१ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास बजरंग चौकातील बँकेत कामानिमित्त गेल्या होत्या. तिथे फॉर्म भरत असताना तिथे उपस्थित असलेली आरोपी महिला रूपाली ब्राह्मणे हिच्याशी त्यांचा क्षुल्लक कारणावरून वाद झाला.




​बँकेत सर्वांसमोर झालेल्या या शाब्दिक हुज्जतीनंतर आरोपी रूपाली हिला राग अनावर झाला. तिने रुख्मीन यांना हाताच्या पटाने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. एवढ्यावरच न थांबता, तिने काउंटरवर असलेले स्टॅप्लर उचलून रुख्मीन यांच्या डोक्यावर आणि डाव्या डोळ्याच्या वर जोराने मारले. या हल्ल्यात रुख्मीन यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. मारहाणीनंतर तू बाहेर भेटली तर तुला जीवे मारेन, अशी धमकीही आरोपी महिलेने दिली. या अचानक घडलेल्या प्रकारामुळे बँकेतील नागरिक आणि कर्मचाऱ्यांची एकच धांदल उडाली.




सिडको पोलिसांत गुन्हा दाखलया घटनेनंतर पीडित महिलेने सिडको पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. रुख्मीन भगुरे यांच्या तक्रारीवरून सिडको पोलिसांनी आरोपी रूपाली ब्राह्मणे हिच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ११८(१), ११५(२), ३५२ आणि ३५ multi (२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक अतुल येरमे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस अंमलदार डिकोडंवार या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.




दरम्यान, या घटनेची सध्या छत्रपती संभाजीनगर शहरात चांगलीच चर्चा होत आहे. बँकेत अशाप्रकारे घटना घडल्याने अनेकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ही घटना घडली तेव्हा बँकेच्या सुरक्षारक्षकांना महिलांमधील हाणामारी रोखण्यात यश कसं आलं नाही? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. तसेच एक नागरीक म्हणून बँकेत अशाप्रकारे हिंसकपणे वागणे शोभणीय नाही, अशी देखील प्रतिक्रिया अनेकांकडून दिली जात आहे. या घटनेनंतर आता संबंधित महिलेला काय शिक्षा मिळते? ते पाहणे महत्त्वाचे आहे.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.