म.टा.वृत्तसेवा, नवी मुंबई :मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (एपीएमसी) कांदा-बटाटा बाजारात डिजिटल जाहिरात होर्डिंगला अडथळा ठरणारी आठ झाडे रात्रीच्या वेळी तोडण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.




सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्हविशेष म्हणजे, वृक्षतोडीचा प्रयत्न चार दिवस आधीच झाला होता. त्या वेळी सुरक्षा कर्मचाऱ्यांनी संबंधितांना रोखून वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली होती. उद्यान विभागानेही वृक्षतोडीस कोणतीही परवानगी दिली नसल्याचे स्पष्ट केले होते. असे असतानाही पुन्हा वृक्षतोड झाल्याने एपीएमसीच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.




डिजिटल होर्डिंग उभारण्याची परवानगीएपीएमसीच्या बाजार आवारात एका जाहिरात कंपनीला डिजिटल होर्डिंग उभारण्याची परवानगी देण्यात आली आहे. कांदा-बटाटा बाजारातील काही होर्डिंगच्या परिसरात असलेल्या झाडांमुळे जाहिराती स्पष्ट दिसत नसल्याचे जाहिरात कंपनीकडून सांगण्यात येत होते. त्यामुळे जाहिरातींना अडथळा ठरणारी झाडे हटविण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती आहे.




वृक्षतोडीस परवानगी नसल्याचे स्पष्ट करण्यात आलेचार दिवसांपूर्वी काही व्यक्ती झाडे तोडण्यासाठी परिसरात आल्या होत्या. त्या वेळी सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना मज्जाव केला. याबाबत वरिष्ठ सुरक्षा अधिकारी जगताप यांना माहिती देण्यात आली. त्यानंतर मुख्य सुरक्षा अधिकारी आणि उद्यान विभागाशी संपर्क साधण्यात आला. उद्यान विभागाकडून वृक्षतोडीस परवानगी नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे हा प्रकार पुन्हा होणार नाही, अशी अपेक्षा होती.







पर्यावरणप्रेमींची नाराजीमात्र, शनिवारी रात्री असताना यंत्रसामग्री आणि मनुष्यबळाच्या मदतीने आठ झाडे तोडण्यात आली. त्यामुळे संबंधित डिजिटल होर्डिंगवरील जाहिरातींचा मार्ग मोकळा झाल्याचा आरोप होत आहे. बाजार समितीच्या आवारात विना परवानगी वृक्षतोड झाल्याने पर्यावरणप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.




सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नएपीएमसीसारख्या महत्त्वाच्या बाजारपेठेत मोठी सुरक्षा यंत्रणा कार्यरत असताना रात्रीच्या वेळी आठ झाडे तोडली जातात आणि ही बाब सुरक्षा यंत्रणेच्या निदर्शनास येत नाही, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. घटनावेळी कोणत्या सुरक्षा कर्मचाऱ्यांची ड्युटी होती, वृक्षतोडीचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे का आणि संबंधित व्यक्तींना बाजार आवारात प्रवेश कसा मिळाला, याची चौकशी करण्याची मागणी होत आहे.




पर्यावरणप्रेमींचे म्हणणेदरम्यान, बाजार परिसरात हरित क्षेत्र वाढविण्याची गरज असताना जाहिरातींसाठी विद्यमान झाडांची तोड होणे गंभीर असल्याचे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे. या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करून दोषींवर नियमानुसार कारवाई करावी, तसेच भविष्यात व्यावसायिक कारणांसाठी एपीएमसीच्या आवारातील झाडांची तोड होऊ नये, यासाठी स्पष्ट नियमांची कठोर अंमलबजावणी करावी, अशी मागणी होत आहे.







मुख्य सुरक्षा अधिकाऱ्यांकडून कबुलीएपीएमसीचे मुख्य सुरक्षा अधिकारी चक्रधर पवार यांनी बाजार आवारात विनापरवानगी झाल्याचे मान्य केले. ही वृक्षतोड जाहिरात कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून झाली असावी, असा प्राथमिक अंदाज त्यांनी व्यक्त केला. या प्रकरणी एपीएमसी पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून, दोषींवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. तसेच वृक्षतोड होत असताना सुरक्षा रक्षकांकडून दुर्लक्ष झाले का, याचीही चौकशी करण्यात येणार असल्याचे पवार यांनी सांगितले.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.