सुधीर पाटील, सातारा : बिबट्याच्या हल्ल्यात दोन वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सातारा तालुक्यातील न्हाळेवाडी (पुनर्वसित) गावात घडली आहे. जय संदीप खंडागळे (२ वर्षे), असे मृत चिमुकल्याचे नाव आहे. निष्पाप चिमुकल्याच्या दुर्दैवी मृत्यूने सातारा तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. तसेच वन खात्याच्या विरोधात संताप व्यक्त होत आहे.
अंधाराचा फायदा घेत बिबट्याची चिमुकल्यावर झेपसातारा तालुक्यातील पुनर्वसित न्हाळेवाडी गावातील बौद्ध वस्तीच्या पाठीमागील ओढ्याच्या परिसरात शनिवारी रात्री सायंकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली. गावातील वीज पुरवठा खंडित झाला होता. यावेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने अंधाराचा फायदा घेत अवघ्या 2 वर्षांच्या जयवर झेप घेतली आणि त्याला शेताच्या अन् ओढ्याच्या दिशेने ओढत नेले. मुलाला बिबट्याने पळवून नेल्याचे समजताच गावातील तरुणांनी शोधाशोध सुरू केली. बौद्ध वस्तीच्या पाठीमागील ओढ्यामध्ये बिबट्या मुलाला घेऊन बसलेला दिसताच तरुणांनी मोठा गोंधळ घालून बिबट्याला पळवून लावले. मात्र चिमुरड्याचा जीव वाचू शकला नाही.
ग्रामस्थांचा वन विभागावर आरोपदोन वर्षांच्या चिमुकल्या जयच्या शरीरावर बिबट्याच्या तीक्ष्ण दातांच्या अन् पंजामुळे झालेल्या जखमा स्पष्टपणे दिसून येत होत्या. बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाला होता. त्याला तातडीने उपचारासाठी नेण्यात आले. परंतु, दुर्दैवाने उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. लोकवस्तीपर्यंत बिबट्यांचा वावर वाढला आहे. मात्र, वन विभागाचे साफ दुर्लक्ष आहे. वन विभागाच्या दुर्लक्षामुळेच निष्पाप चिमुकल्याचा बळी गेल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
महावितरणाविरोधातही संतापरात्री अचानक वीज पुरवठा खंडित होण्यामुळे ग्रामस्थांना वन्य श्वापदांपासून धोका निर्माण होतो, अशी तक्रार करत अवघ्या दोन वर्षांच्या चिमुरड्याच्या मृत्युनंतर महावितरणविरोधात देखील न्हाळेवाडी ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. दरम्यान, वन विभागाने या घटनेची तत्काळ दखल घेऊन बिबट्याला जेरबंद करण्यासाठी त्वरित पिंजरा लावावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संतप्त ग्रामस्थांनी दिला आहे.