मुंबई : भारतीय संघाने पहिल्या टी-२० सामन्यामध्ये वेस्ट इंडिज संघाचा पराभव केला. पण दुसरीकडे भारत अ संघाला पराभवाचा सामना करावा लागला. पहिल्या वनडे सामन्यामध्ये ऑस्ट्रेलिया अ संघाने भारत अ संघावर १२५ धावांनी विजय मिळवला. पहिल्यांदा फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाचा संघ २७४ धावांवर ऑल आऊट झाला होता. नॅथन मॅकस्वीनीने १२३ धावांची शतकी खेळी केली होती. तर कॅप्टन विल सदरलँडने ७७ धावा केल्या होत्या. भारताकडून सूर्यांश शेडगे याने चार विकेट घेतल्या होत्या. मात्र या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघ अपयशी ठरला. ऑस्ट्रेलिया अ संघाने भारताला १४९ धावांवर ऑल आऊट केले. भारतीय फलंदाज ढेपाळल्याने पहिल्या सामन्यात भारताला १२५ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला.




ऑस्ट्रेलियाने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीला साई सुदर्शन आणि प्रभसिमरन सिंग उतरले होते. भारताची सुरूवात खराब झाली होती, पॉवर प्लेमध्येच भारताच्या तीन विकेट गेल्या होत्या. साई सुदर्शन १ धाव, प्रभसिमरन सिंग १७ धावा आणि देवदत्त पडिक्कला खातेही उघडता आले नाही. महत्वाच्या विकेट गेल्याने भारत बॅकफूटवर गेला होता. एका मोठ्या भागीदारीची भारताला गरज होती. कॅप्टन ऋतुराज गायकवाड आणि रजत पाटीदार सावध खेळत धावा जोडायला सुरूवात केली. ३४ धावांची भागीदारी झाल्यावर स्पेन्सर जॉन्सन याने ऋतुराजला १५ धावांवर आऊट करत चौथा धक्का दिला.




रजत पाटीदारने निशांत सिंधूसोबत ४७ धावांची भागीदारी करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण निशांत सिंधूही ३१ धावा करून माघारी परतला. सूर्यांश शेडगेकडून सर्वांना अपेक्षा होत्या. मात्र तोसुद्धा ३ धावांवर आऊट झाला. रजत पाटीदार याने एक बाजू लावून धरली होती पण त्याला दुसऱ्या बाजूने साथ मिळाली नाही. रजत अर्धशतकी खेळी करून ५३ धावांवर आऊट झाला. त्याने आपल्या खेळीत ५ चौकार आणि आणि षटकार मारला. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज महली बियर्डमन याने भारताच्या चार विकेट घेत विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.







ऑस्ट्रेलियाचा अर्धा संघ ८७ धावांवर माघारी परतला होता. पण कॅप्टन विल सदरलँड आणि थन मॅकस्वीनी यांची १४१ धावांची भागीदारी भारताला चांगलीच महागात पडली. तीन सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलिया संघाने १-० ने आघाडी घेतली आहे.




भारत अ (प्लेइंग 11): साई सुदर्शन, प्रभसिमरन सिंग (WK), देवदत्त पडिक्कल, ऋतुराज गायकवाड (C), रजत पाटीदार, निशांत सिंधू, सूर्यांश शेडगे, विपराज निगम, अनुकुल रॉय, अर्शद खान, यश ठाकूर

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.