इंडी’ आघाडीच्या बैठकीनंतर गांधी यांचे विधान
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात विरोधी पक्ष आपला संघर्ष चालू ठेवणार असून पुढे आम्ही काय करणार आहोत, हे गुपित ठेवले जाणार आहे. त्याची घोषणा केली जाणार नाही. तथापि, विरोधक सत्ताधाऱ्यांना आश्चर्याचा धक्का देतील, असे प्रतिपादन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले आहे. मंगळवारी विरोधकांच्या ‘इंडी’ आघाडीची बैठक झाल्यानंतर ते पत्रकारांसमोर बोलत होते.
विरोधी पक्षांचे आंदोलन थांबणार नाही. आज, नाहीतर उद्या, नाहीतर काही महिन्यांनी, नाहीतर काही वर्षांनी आम्ही आमचे ध्येय गाठणार आहोत. ते केव्हा गाठले जाईल, हे आत्ता सांगता येणार नाही. तथापि, ते साध्य होईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. विरोधी पक्ष आंदोलन करीत राहतील. सत्ताधाऱ्यांना आम्ही आश्चर्याचा धक्का देणार आहोत, असे प्रतिपादन राहुल गांधी यांच्याकडून झाले.
बैठकीत भूमिकेवर विचार
विरोधी पक्षांच्या बैठकीत पुढे काय करायचे यावर विचार करण्यात आला, अशी माहिती सूत्रांनी दिली. विरोधक आंदोलन थांबविणार नाहीत. तसेच, हे आंदोलन आत्ता आहे त्याच उत्साहात पुढेही केले जाईल. केंद्र सरकार आणि ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आम्ही संघर्ष करीत आहोत. मी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे आभार मानतो, असेही राहुल गांधी यांनी स्पष्ट केले.
लोकशाहीसाठी संघर्ष
आमचा संघर्ष लोकशाहीसाठी आहे. एसआयआय प्रक्रिया लोकशाहीच्या विरोधात आहे. एसआयआर प्रक्रिया पूर्णपणे रद्द केली पाहिजे, अशी विरोधकांची मागणी आहे. आम्ही ती मागणी कधीही सोडणार नाही. एसआयआर प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने हाताळली जात आहे. आम्ही, जनतेसाठी संघर्ष करीत आहोत. आम्हाला कोणी रोखू शकत नाही, असेही प्रतिपादन राहुल गांधी यांनी केले.
जंतरमंतर मिळविणार
केंद्र सरकारने जंतरमंतरवर आंदोलने करण्यास बंदी घातली आहे. तथापि, हे आंदोलनांचे स्थळ आहे. आम्ही हे स्थळ आंदोलनांसाठी परत मिळविणार आहोत. त्यासाठी आम्ही संघर्ष करणार आहोत. अनेक आंदोलने या स्थळी झाली आहेत. केंद्र सरकारचा निर्णय चुकीचा आहे, असा आरोपही राहुल गांधी यांनी केला आहे.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.