एल निनोच्या संभाव्य प्रभावामुळे ठाणे पालिका प्रशासन आता ॲक्शन मोडवर आले आहे. पाण्याची गळती रोखण्यासाठी प्रेशर मॉनिटरिंग, रडार तंत्रज्ञान आणि सीसीटीव्ही, रोबोटचा वापर करून पालिका प्रशासन पाण्याचा एक एक थेंब वाचवणार आहे. रस्त्याखालील जलवाहिन्यांना लागलेली गळती आधुनिक तंत्रज्ञानामुळे प्रशासनाला तत्काळ कळणार आहे.
ठाणे शहराला दररोज सुमारे ५९० दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणीपुरवठा केला जातो. वाढती लोकसंख्या आणि दिवसेंदिवस वाढणारी पाण्याची मागणी यामुळे उपलब्ध पाण्याचे नियोजन करणे महापालिकेसमोर मोठे आव्हान आहे. त्यातच पावसाचे कमी प्रमाण आणि एल निनोच्या संभाव्य प्रभावामुळे पाणीटंचाईची शक्यता लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने कंबर कसली आहे. जलवाहिन्यांमधील गळती शोधण्यासाठी महापालिका आता आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेणार आहे.
■ प्रेशर मॉनिटरिंग, रडार तंत्रज्ञान आणि सीसीटीव्ही रोबोटच्या माध्यमातून जलवाहिन्यांची तपासणी करून गळतीची ठिकाणे शोधण्यात येणार आहेत. या तंत्रज्ञानामुळे जलवाहिन्यांमधील गळतीचे अचूक ठिकाण शोधून आवश्यक दुरुस्ती करणे शक्य होणार आहे.
■ पाण्याची नासाडी कमी करून उपलब्ध पाण्याचा अधिकाधिक वापर नागरिकांसाठी करता येईल, अशी माहिती पालिकेचे उपनगर अभियंता विनोद पवार यांनी दिली.
दीड वर्षात पावणेपाच हजार ठिकाणी गळती रोखली
ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून नागरिकांच्या तक्रारी तसेच प्रत्यक्ष पाहणीच्या आधारे गळतीची ठिकाणी दुरुस्ती केली जात आहे. गेल्या दीड वर्षात पावणेपाच हजार ठिकाणची गळती रोखण्यात आली आहे. यामध्ये १५ मिलीमीटरपासून ते १ हजार ५०० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिन्यांचा समावेश असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.