स्वयंपाकघरात प्रेशर कुकरचा वापर जवळपास प्रत्येक घरात होतो. डाळ, भात, वरण किंवा भाज्या शिजवण्यासाठी कुकरमुळे वेळ आणि गॅस दोन्हींची बचत होते. मात्र, कुकर वापरताना त्याच्या झाकणावर असलेल्या छोट्या रिंगकडे तुमचं कधी लक्ष गेलं आहे का? दिसायला साधी वाटणारी ही रिंग कुकरच्या सुरक्षित वापरासाठी अत्यंत महत्वाची असते. जाणून घ्या या छोट्या दिसणाऱ्या रिंगचा नेमका कशासाठी वापर होतो.
वाफ रोखणे
प्रेशर कुकरच्या झाकणावरील रबर किंवा सिलिकॉनची रिंग म्हणजेच गॅस्केट. ती झाकण आणि कुकरच्या भांड्यामधील फट बंद करण्याचं काम करते. त्यामुळे कुकरमधील वाफ सहज बाहेर पडत नाही आणि आत योग्य दाब निर्माण होण्यास मदत होते.
अन्न शिजण्यास मदत
कुकरमध्ये दाब वाढल्यामुळे पाण्याचं तापमान सामान्य उकळत्या पाण्यापेक्षा जास्त होऊ शकतं. त्यामुळे अन्न लवकर शिजतं. मात्र, यासाठी रिंग योग्य स्थितीत असणं आणि कुकरची इतर सुरक्षा यंत्रणा व्यवस्थित काम करणं आवश्यक आहे.
रिंग खराब झाल्यास…
रिंग जुनी झाली, तिला तडे गेले किंवा ती सैल झाली, तर कुकरमधून वाफ बाहेर येऊ शकते. त्यामुळे दाब व्यवस्थित तयार न होणं किंवा अन्न शिजायला जास्त वेळ लागणं अशा समस्या उद्भवू शकतात.
काय काळजी घ्यावी?
प्रत्येक वापरापूर्वी रिंग योग्य प्रकारे बसली आहे का, ती फाटलेली किंवा कडक झाली आहे का, हे तपासा. खराब रिंग बदलताना कुकरच्या मॉडेलला अनुरूप रिंगच वापरा. तसेच, कुकर पूर्णपणे दाबमुक्त झाल्याशिवाय झाकण उघडू नका.