कॅलिफोर्निया : कॅलिफोर्नियामध्ये 'इमिग्रेशन अँड कस्टम्स एनफोर्समेंट' (आयसीई) च्या एजंट्सनी आपल्या पत्नीचं अपहरण केल्याचा बनाव भारतीय वंशाच्या २८ वर्षीय पतीने केला होता. मात्र त्याचं सोंग उघडं पडलं असून तिच्या हत्येप्रकरणी आता पतीला अटक करण्यात आली आहे. मूळची भारतातील असलेली ३० वर्षीय जास्मिन गिल ही ३० सप्टेंबर रोजी अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातील सॅक्रामेंटो शहरातील तिच्या राहत्या घरी शेवटची दिसली होती. चार दिवसांनंतर तिच्या चुलत भावाने जास्मिन बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली.




आयसीई एजंट्सवर पतीचा आरोपसुरुवातीच्या तपासादरम्यान, तिचा पती गुरिंदर गिल याने असा दावा केला की, 'आयसीई'च्या एजंट्सनी तिला ताब्यात घेतलं. इमिग्रेशन अँड कस्टम्स एनफोर्समेंट ही संस्था इमिग्रेशन नियमांचे उल्लंघन केल्याच्या संशयावरून परदेशी नागरिकांना ताब्यात घेऊ शकते. जास्मिन त्यांच्या घराबाहेर टपाल तपासत असताना तिला याच एजंट्सनी ताब्यात घेतल्याचा दावा पतीने केला होता. त्यानंतर पोलिसांनी आयसीईशी संपर्क साधला, तेव्हा त्या ठिकाणी अशी कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचं स्पष्ट झालं.




मुलाच्या कस्टडीवरुन वादसॅक्रामेंटो काउंटी शेरिफ कार्यालयाने १६ ऑक्टोबर रोजी जारी केलेल्या निवेदनात म्हटले की, "तपास जसजसा पुढे सरकला, तसतसे तपासकर्त्यांना गुरिंदरच्या जबाबांमध्ये अनेक विसंगती आढळल्या. त्यांना समजले की, जास्मिन आणि गुरिंदर यांच्यात घटस्फोटाची प्रक्रिया सुरु होती आणि मुलाच्या ताब्यावरुन त्यांच्यात वाद सुरु होता."




१ ऑक्टोबर रोजी 'एल डोराडो काउंटी'मध्ये मानवी शरीराचे जळलेले अवशेष सापडले. नंतर हे अवशेष जास्मिनचेच असल्याचे निष्पन्न झाले. तपासाच्या आधारे, पोलिसांनी गुरिंदरविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करुन अटक वॉरंट मिळवले आणि १४ ऑक्टोबर रोजी त्याला अटक केली. सध्या तो सॅक्रामेंटो काउंटी मुख्य कारागृहात असून, त्याला जामीन मिळण्याची शक्यता नाही.




आयसीईवर अनेकदा आक्रमक आणि हिंसक पद्धती वापरल्याबद्दल टीका होत असते, त्यांनी गुरिंदरला "मानसिक संतुलन बिघडलेली व्यक्ती" असे संबोधले. एक्सवर पोस्ट करताना त्यांनी लिहिलं की, "असे वेडे लोक ICE च्या त्या शूर अधिकारी-कर्मचाऱ्यांना बळीचा बकरा बनवण्याचा प्रयत्न करतात, जे धोकादायक गुन्हेगारांना बाहेर काढण्यासाठी अहोरात्र काम करतात; तर दुसरीकडे, हे लोक स्वतःच गुन्हेगारी कृत्य करतात."




'जास्मिनचं पार्थिव घरी आणा'जास्मिनच्या कुटुंबीयांनी ती एक समर्पित मुलगी, प्रेमळ बहीण, काळजी घेणारी नर्स आणि ८ महिन्यांच्या चिमुकल्या मुलाची आई असल्याचं सांगितलं. त्याला आईची सर्वाधिक गरज होती. जास्मिनला अशा अत्यंत भीषण आणि अकल्पनीय पद्धतीने गमावल्याचं दुःख शब्दांत मांडणं अशक्य आहे. अवघ्या ३० वर्षांच्या वयात हे घडलं. तिच्या आयुष्यातील बराच प्रवास अजून बाकी होता" असे तिच्या कुटुंबीयांनी 'गो-फंड-मी' पेजवर म्हटलं आहे. तिचं पार्थिव भारतात परत आणण्यासाठी हे पेज सुरु करण्यात आलं आहे.




त्या पेजवर पुढे म्हटले आहे, "तिच्या दुर्दैवी गोष्टीतील सर्वात वेदनादायी बाब म्हणजे, ती स्वतःसाठी आणि आपल्या बाळाच्या चांगल्या भविष्यासाठी संघर्ष करत होती. ती घटस्फोट घेण्याच्या प्रयत्नात होती. तिला स्वतःसाठी आणि आपल्या बाळासाठी असं स्वातंत्र्य, सुरक्षितता आणि एक नवी सुरुवात हवी होती, ज्याचे ते दोघेही वाटेकरी होते. दुर्दैवाने हे भविष्य घडवण्याआधीच जास्मिनची हत्या झाली. ज्याच्या संरक्षणासाठी ती अहोरात्र संघर्ष करत होती, ते बाळ तिच्या पश्चात एकटं पडलं"




वडिलांचं निधन, वृद्ध आईपेजवरील माहितीनुसार, जास्मिनने लहान वयातच आपल्या वडिलांना गमावलं होतं. तिची आई, सुखविंदर कौर भारतात नर्स म्हणून काम करत होत्या - त्यांनी जास्मिनला आणि तिच्या भावाला एकटीने लहानाचं मोठं केले. एका व्हिडिओमध्ये सुखविंदर कौर म्हणाल्या, "माझ्या मुलीला खूप क्रूरतेचा सामना करावा लागला. मी विनंती करते की तिचा मृतदेह इथे (भारतात) पाठवला जावा" असंही त्यांनी सांगितलं.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.