हैदराबाद/न्यूयॉर्क : २५ वर्षीय भारतीय तरुणीचा अमेरिकेत संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मूळ तेलंगणातील रहिवासी असलेल्या युवतीची प्राणज्योत न्यूयॉर्कमधील अल्बानी येथे शुक्रवारी अकस्मात मालवली. हृदयविकाराच्या झटक्याने तिचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.




तरुणीने नुकतीच 'मास्टर ऑफ सायन्स' (एमएस) पदवी पूर्ण केली होती आणि तिला नोकरीही मिळाली होती; आयुष्यातील एका नवीन अध्यायाची सुरुवात करण्याच्या तयारीत असतानाच ही दुर्दैवी घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.




तेलंगणातील बिझनेसमनची कन्यातेलंगणातील व्यावसायिक नल्लामाला आनंद यांची कन्या अक्षिता उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला गेली होती आणि तिने नुकतीच आपली एमएस पदवी पूर्ण केली होती. नल्लामाला आनंद हे खम्मम व्यापारी संघटनेचे अध्यक्ष आहेत.




चार वर्षांपासून अक्षिता एमएसच्या पदवीचे शिक्षण घेत होती. ती अल्बानी येथे भाऊ अक्षयसोबत राहत होती.




वडिलांशी फोनवर बोलणं झाल्यानंतर कोसळलीकुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्रीच्या जेवणानंतर अक्षिता आपल्या घराबाहेर फेरफटका मारत होती. तिने भारतात असलेल्या आपल्या वडिलांशी फोनवर बातचीतही केली. बोलणं संपवल्यानंतर लगेचच हृदयविकाराच्या झटक्यामुळे ती अचानक कोसळली.




तिचा भाऊ अक्षय याने पाहिलं तेव्हा ताई जमिनीवर बेशुद्धावस्थेत पडली होती. त्याने इतरांच्या मदतीने बहिणीला तातडीने रुग्णालयात नेले, परंतु काहीही उपयोग झाला नाही. कारण डॉक्टरांनी तिला रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले.




नव्या अध्यायाच्या सुरुवातीआधीच अंतअक्षिताचे वडील नल्लामाला आनंद यांनी सांगितले की, "अक्षिताला नुकतीच नोकरी मिळाली होती आणि ती कामाला सुरुवात करण्याच्या तयारीत होती. अशा परिस्थितीत तिचा अचानक झालेला मृत्यू कुटुंबासाठी अत्यंत धक्कादायक आहे."




कुटुंबीय धक्क्यात, पार्थिव आणण्याची तयारीतेलंगणातील खम्मम जिल्ह्यात राहणारे तिचे कुटुंबीय आता तिचं पार्थिव अंत्यसंस्कारांसाठी भारतात परत आणण्याची व्यवस्था करत आहेत. या घटनेमुळे कुटुंबीयांसहं नातेवाईक, मित्र मंडळी आणि परिचितांना मोठा धक्का बसला आहे.




अलिकडच्या काळात, वाढते ताण तणाव आणि कामाच्या दबावामुळे उद्भवलेल्या हृदयविकाराच्या समस्यांमुळे परदेशात राहणाऱ्या तेलुगू वंशाच्या अनेक व्यक्तींचे निधन झाले आहे. या घटनेने तेलुगू समुदायावरही शोककळा पसरली आहे.




कल्याण येथे ‘हिट अँड रन’मध्ये तरुणाचा मृत्यूदुसरीकडे, पहाटे मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या २६ वर्षीय तरुणाला भरधाव कारने धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना कल्याण पश्चिमेतील निक्कीनगर चौकात घडली. या हिट अँड रन प्रकरणात खडकपाडा पोलिसांनी तांत्रिक तपासाद्वारे कारचालकाचा शोध घेऊन त्याला अटक केली आहे. कोमिल अनिल गायकर (२३) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. अपघातग्रस्त कारही पोलिसांनी जप्त केली आहे.




सुनील कोळी हा तरुण पहाटे फिरण्यासाठी घराबाहेर पडला होता. कल्याण पश्चिमेतील निक्कीनगर चौकात रस्त्याच्या कडेला चालत असताना समोरून भरधाव कारने त्याला धडक दिली. सुनील उंच फेकला जाऊन रस्त्याच्या कडेला उभारलेल्या शुभेच्छा कमानीत आदळला. या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर चार तासांनी परिसरातील नागरिकांना कमानीजवळ रक्ताच्या थारोळ्यात तरुण पडल्याचे दिसले. त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली.




पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास केला असता हा प्रकार हिट अँड रन असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर अपघातग्रस्त कारचा शोध घेण्यात आला. शुक्रवारी पोलिसांनी कोमिल गायकर याला ताब्यात घेऊन सुमारे चार तास चौकशी केली. त्यानंतर त्याला अटक करण्यात आल्याची माहिती खडकपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र खेडकर यांनी दिली.




दरम्यान, पोलिसांनी जप्त केलेल्या कारवर ‘विधानसभा सदस्य’ असे नमूद असल्याचे समोर आले आहे. आरोपी हा एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याचा नातेवाईक असल्याने त्याला वाचविण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून प्रयत्न सुरू असल्याची चर्चा स्थानिक पातळीवर सुरू आहे.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.