म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : तांबे या धातूला बाजारात सोन्याचे दिवस आले आहेत. इलेक्ट्रिक वाहने, सोलार पॅनल, डेटा सेंटर, वीज वितरण व्यवस्था आणि औद्योगिक यंत्रसामग्रीमुळे तांब्याची मागणी दिवसेन् दिवस वाढू लागली आहे. त्यामुळे पूर्वी काच, कागद, पत्रा यांसाठी आग्रही असणारे भंगारव्यावसायिक आता जुनी विद्युत उपकरणे आणि त्यातील तांबे यांची सातत्याने विचारणा करत आहेत.
जुने हिटर, एसी, इस्त्री, सीलिंग फॅन, वॉशिंग मशीन, संगणक आणि इतर विद्युत उपकरणांमधून तांबे वेगळे करून ते चांगल्या दराने विकले जात आहे. परिणामी, भंगारव्यावसायिकांचीही चांदी झाली आहे. जुन्या उपकरणांच्या भंगारालाही यामुळे बाजारात महत्त्व प्राप्त झाले आहे.
विक्रोळी येथील सोनालाल यांनी लघुउद्योजकांशी संपर्क वाढवून त्यांच्याकडील भंगारातून तांबे वेगळे करण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. मागील दोन-तीन वर्षांत या कामातून अधिक नफा मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
तांबे हा विद्युत आणि उष्णता वहनासाठी अत्यंत उपयुक्त धातू आहे. त्यामुळे घरगुती विद्युत तारा, ट्रान्सफॉर्मर, वाहने, औद्योगिक यंत्रसामग्री, एसी आणि इतर उपकरणांमध्ये त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. इलेक्ट्रिक वाहनांमध्ये मोटर, वायरिंग आणि विविध विद्युत जोडण्यांसाठी तांब्याची गरज असते. तसेच, चार्जिंग स्टेशन उभारणीसाठीही तांब्याचा वापर वाढत असल्याचे या व्यवसायातील राजेंद्र सिंह यांनी सांगितले.
सौरऊर्जा, पवनऊर्जा, वीज वितरण व्यवस्था आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित डेटा सेंटरच्या विस्तारामुळे तांब्याची मागणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. प्रत्येक उपकरणातून मिळणाऱ्या तांब्याचे प्रमाण वेगवेगळे असते. तसेच, तांब्याचा दर त्याची शुद्धता, प्रकार आणि बाजारातील मागणी यावर अवलंबून असतो.
तांब्याच्या किंमती गगनाला भिडणार?त्याचवेळी, तांब्याचा पुरवठा वाढवणे दिवसेंदिवस कठीण होत असल्यामुळे येत्या काही वर्षांत किमती वाढू शकतात असे गोल्डमन सॅक्सच्या अहवालातून समोर आले आहे. नवीन खाणींचा शोध न लागणे आणि उत्पादन सुरू होण्यास लागणारा मोठा कालावधी यामुळे पुरवठा मागणीच्या आवाक्याबाहेर राहू शकतात.
गोल्डमन सॅक्सच्या अहवालानुसार 1990 च्या दशकापासून तांब्याच्या नवीन मोठ्या खाणींचे साठे कमी झाले. तसेच अनेक खाणींमध्ये धातूच्या कच्च्या मालाची गुणवत्ता, म्हणजेच त्यातील तांब्याचे प्रमाण, देखील कमी होत आहे. ही समस्या विशेषतः दक्षिण अमेरिकेत अधिक दिसून येत आहे.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.