जितेंद्र खापरे, नागपूर : नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत एकूण ६०.६९ टक्के मतदान झाले आहे. सहा जिल्ह्यांमध्ये पार पडलेल्या मतदानात वर्धा जिल्ह्यात सर्वाधिक ६८.८६ टक्के मतदानाची नोंद झाली. विशेष म्हणजे, अतिदुर्गम गडचिरोली जिल्ह्यातही ६८.७८ टक्के मतदान झाले आहे. नागपूर जिल्ह्यात ६०.२० टक्के, गोंदिया जिल्ह्यात ६२.५७ टक्के, चंद्रपूर जिल्ह्यात ५८.२० टक्के, तर भंडारा जिल्ह्यात ५२.३५ टक्के मतदान झाले. या मतदानानंतर आता भाजपचे सुधाकर कोहळे आणि काँग्रेसचे विधान परिषदेचे विद्यमान आमदार अभिजित वंजारी यांच्यातील लढतीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत एकूण ३८ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे.




भाजपचे सुमारे ५७ वर्षे वर्चस्व भाजपचे सुमारे ५७ वर्षे वर्चस्व होते. मात्र, २०२० मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या अभिजित वंजारी यांनी भाजपचे उमेदवार संदीप जोशी यांचा पराभव करत हा गड जिंकला होता. गेल्या निवडणुकीत अभिजीत वंजारी यांनी १८ हजार ९१० मतांच्या फरकाने विजय मिळवला होता. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत भाजपला आपला मतदारसंघ पुन्हा मिळवण्याचे, तर काँग्रेसला आपली जागा कायम राखण्याचे आव्हान आहे.







प्रमुख नेत्यांचा प्रचारात सहभागया निवडणुकीत भाजपने यांना उमेदवारी देत मतदारसंघ पुन्हा ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न केले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह पक्षातील प्रमुख नेत्यांनी प्रचारात सहभाग घेतला. भाजपची संघटनात्मक ताकद आणि स्थानिक नेत्यांचे जाळे या निवडणुकीत किती प्रभावी ठरते, हे निकालातून स्पष्ट होईल. तर दुसरीकडे, विद्यमान आमदार अभिजित वंजारी यांच्यासमोर मागील निवडणुकीतील विजयाची पुनरावृत्ती करण्याचे आव्हान आहे. त्यामुळे ही निवडणूक दोन्ही प्रमुख पक्षांसाठी प्रतिष्ठेची ठरली आहे.




अनिल सोले यांचे नाव मतपत्रिकेवर कायमया निवडणुकीत बंडखोर उमेदवारांच्या भूमिकेचीही चर्चा झाली. माजी आमदार अनिल सोले यांनी भाजपशी बंडखोरी करत अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली होती. मात्र त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांची बंडखोरी नमवण्यात यश आले होते. त्यानंतर अनिल सोले यांनी पक्षाचे अधिकृत उमेदवार सुधाकर कोहळे यांना पाठिंबा देत निवडणुकीतून माघार घेतली असली तरी मतपत्रिकेवर त्यांचे नाव कायम असल्याने त्यांना मिळणाऱ्या मतांबाबत उत्सुकता लागली आहे. काँग्रेसचे उमेदवार अभिजित वंजारी यांनी अनिल सोले यांचा चाहतावर्ग आणि भाजपच्या कार्यपद्धतीवर नाराज असलेले मतदार त्यांना मतदान करू शकतात, असा दावा केला होता. तर दुसरीकडे, आपले समर्थक कोहळे यांना मतदान करतील, असा विश्वास अनिल सोले यांनी व्यक्त केला.







मतमोजणीची प्रक्रिया निर्णायक ठरणारमतदार यादीतील सुमारे आठ हजार ५०० दुबार नावांचा मुद्दाही वंजारी यांनी उपस्थित केला होता. याशिवाय, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून बंडखोरी करून निवडणूक लढवणारे नितेश कराळे यांच्यामुळे काँग्रेसच्या मतांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. विशेष म्हणजे, या निवडणुकीत पसंतीक्रमानुसार मतदान होत असल्याने मतमोजणीची प्रक्रिया निर्णायक ठरणार आहे. पहिल्या पसंतीची मते आणि आवश्यकतेनुसार पुढील पसंतीच्या मतांची मोजणी यामुळे निकालाचे गणित बदलू शकते.




निकालाकडे राजकीय वर्तुळाचे लक्षएकूण ६०.६९ टक्के मतदानानंतर भाजप आणि काँग्रेसच्या समर्थकांकडून विजयाचे दावे केले जात आहेत. भाजपला आपले पारंपरिक वर्चस्व पुन्हा प्रस्थापित करायचे आहे, तर काँग्रेसला मागील निवडणुकीतील यश कायम ठेवायचे आहे. बंडखोर उमेदवारांना मिळणारी मते, सहा जिल्ह्यांतील मतदानाचा कल आणि पसंतीक्रमानुसार होणारी मतमोजणी या बाबी निकालात महत्त्वाच्या ठरू शकतात. त्यामुळे नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाचा विजयाचा गुलाल नेमका कोण उधळणार? हे मतमोजणीनंतरच स्पष्ट होणार आहे.




Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.