मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेली एक डॉक्युमेंट्री गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होती. मात्र मुंबई पोलिसांनी केलेल्या विनंतीनंतर आता मी ही डॉक्युमेंट्री डिलीट करत असल्याचं राज यांनी जाहीर केलं आहे. मात्र त्याचवेळी मोदी सरकारकडून हा देश कसा गौतम अदानी यांच्या ताब्यात सोपवला जात आहे, याबाबतचे आपले जुने भाषणा राज ठाकरेंनी शेअर करत पुन्हा एकदा सरकारवर हल्लाबोल केला आहे.
राज ठाकरे यांनी म्हटलंय की, "सबीर भाटिया यांची डॉक्युमेंट्री शेअर केल्यावर तिला जो प्रचंड प्रतिसाद मिळाला, त्यामुळे वरच्या लोकांच्या पोटात गोळा उत्पन्न होणे आणि आपलं गुपित फुटलं याची भीती निर्माण होणं हे स्वाभाविक होतं. पण त्याची तीव्रता असावी की मला मुंबईच्या पोलीस आयुक्तांच्या मार्फत ही डॉक्युमेंट्री काढावी, अशी विनंती करण्यात आली. या प्रकरणात मुळात मला जे म्हणायचं होतं ते जानेवारी २०२६ च्या सभेत आणि पुन्हा या डॉक्युमेंट्रीला पोस्ट करण्याच्या निमित्ताने केलं गेलं; यातून देशाचं प्रबोधन होणं हाच उद्देश होता आणि आहे. पण मला आलेली विनंती ही मुंबई पोलीस आयुक्तांची आहे. मुंबई आणि महाराष्ट्र पोलीस हे देशातील सर्वात कार्यक्षम पोलीस दल आहे आणि माझ्या मनात नेहमीच त्यांच्याबद्दल आदर राहिला आहे. अशा मुंबई पोलिसांच्या प्रमुखाने केलेल्या विनंतीचा मान राखून या डॉक्युमेंट्रीबाबतची पोस्ट मी डिलीट करतोय," अशी भूमिका राज ठाकरे यांनी मांडली आहे.
"गौतम अदानी आणि यांचा दोस्ताना कसा जुना आहे, आणि यातून अदानींच्या घशात भारतीय उद्योग विश्व कसं घातलं जात आहे याची पूर्ण माहिती देणारी सबीर भाटिया यांची डॉक्युमेंट्री मी माझ्या सोशल मीडियावर शेअर केली. त्याला ४८ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज फक्त ट्विटरवर मिळाले, फेसबुकवर देखील प्रचंड रिस्पॉन्स मिळाला. हे झाले माझ्या सोशल मीडियावरचे व्ह्यूज, बाकी लोकांनी शेअर केलं ते वेगळं आणि त्यातून मिळालेले व्ह्यूज याची मोजदादच नाही.थोडक्यात हा गंभीर विषय लोकांपर्यंत पोहचला पाहिजे ही माझी इच्छा होती, तो हेतू साध्य झाला. अर्थात सबीर भाटियांनी ही डॉक्युमेंट्री आत्ता बनवली. पण त्याच्या आधीच जानेवारी २०२६ ला मुंबईतील शिवतिर्थ येथून मी एक मोठं प्रेझेंटेशन केलं होतं, ज्यात अदानी समूह शब्दशः हा देश कसा गिळंकृत करायला निघाला आहे हे दाखवलं होतं. त्याला अद्वितीय असा प्रतिसाद मिळाला. ते व्हिडीओज आजही माझ्या सोशल मीडियावर आहेत. आम्ही जे सादरीकरण केलं त्यातल्याच काही क्लिप्स या डॉक्युमेंट्रीत पण वापरल्या गेल्या. मी ही डॉक्युमेंट्री शेअर करण्यामुळे जी आग लागायची ती लागली आहे. जानेवारी २०२६ ला शिवतीर्थावरून मी या देशातील एकाधिकारशाहीच्या विरोधात ठिणगी टाकली तिचा वणवा पेटला आहे. आमचा लढा सुरु आहे. जानेवारी २०२६ ची आमची पोस्ट अजून तिथेच आहे आणि तिथेच राहील.आम्ही शेअर केलेली डॉक्युमेंट्री दुसऱ्यांनी बनवली होती ती पण लोकांपर्यंत पोहचावी हा उद्देश होता जो साध्य झाला," असंही म्हटलं आहे.
भीमाशंकर वृक्षतोडीवरूनही सरकारवर हल्लाबोल
भीमाशंकर इथं होत असलेल्या वृक्षतोडीचा मुद्दा एका स्थानिक वृत्तवाहिनीने समोर आणल्यानंतर यावरून सरकारला लक्ष्य केलं जात आहे. राज ठाकरे यांनीही या मुद्दा उपस्थित करत टीकास्त्र सोडलं आहे. "आपल्या भीमाशंकर येथील काहीशे हेक्टर वनजमीन गुजरात मधल्या टोरेंट कंपनीच्या घशात घालायला राज्य सरकारला केंद्र सरकारने सांगितलं आहे. महाराष्ट्रातल्या अनेक वनजमिनी या सरकारने ठरावीक मित्र मंडळी उद्योगपतींच्या घशात घातल्या आहेत आणि अजुन घालायच्या ठरवल्या आहेत. आज कोण कुठच्या पक्षात आहे याच्याशी मला काही देणे घेणं नाही, परंतु आपण या महाराष्ट्राचे नागरिक आहोत आणि आपल्या डोळ्यांदेखत महाराष्ट्र विकला जातोय हे बघताना तुमची तळपायाची आग मस्तकात कशी जात नाही याचंच मला आश्चर्य वाटतं! महाराष्ट्रातल्या आपल्या मराठी खासदारांना , आमदारांना, मंत्र्यांना हे आपल्या डोळ्यांसमोर घडतंय याचा राग सुद्धा येत नाही? सत्तेसमोर इतकं शरण जाणं हे महाराष्ट्राच्या इतिहासाला, परंपरेला आणि संस्कृतीला शोभणारे नाही. कशाला मग आपल्या शिवछत्रपतींच्या घोषणा देता आणि महाराष्ट्र गीत गाण्याचा फार्स करता?" असा उद्विग्न सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.