म. टा. प्रतिनिधी, नाशिक : नामांकित एअरलाइन्समध्ये नोकरी, विमानतळ प्राधिकरणाचे अधिकृत वाटणारे नियुक्तिपत्र, गेट पास, पोलिस व्हेरिफिकेशनची कागदपत्रे आणि फोनवर झालेली ‘मुलाखत’... सर्व काही खरे वाटावे अशी आखणी; पण या चमकदार ऑफर लेटरमागे होता अवघा दहावी पास २४ वर्षीय कॅब चालक. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) मदतीने हुबेहुब बनावट कागदपत्रे तयार करून राज्यातील शेकडो बेरोजगार तरुणांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या या सराइताला नाशिक शहर पोलिसांच्या ठाण्याच्या पथकाने अटक केली आहे.




अवघा दहावी पास असलेला व बदलापूर येथे कॅब चालवणारा राहुल दीपक धुळे उर्फ अमोल सोनवणे (वय २४, रा. जुवेली गाव, बदलापूर पूर्व) असे संशयिताचे नाव आहे. त्याने चालवले असून त्याच्याविरुद्ध नाशिक, मुंबई, पुणे, नागपूर, वर्धा, नांदेड अशा विविध शहरांमध्ये सायबर फसवणुकीचे तब्बल ३८ गुन्हे दाखल आहेत. शहरातील एका खासगी शाळेत लिपिक म्हणून कार्यरत असलेल्या तरुणाला चांगल्या नोकरीचे आमिष दाखवून ६ लाख ४५ हजार रुपयांना लुटल्याची फिर्याद म्हसरूळ पोलिस ठाण्यात दाखल होती. त्याद्वारे सहायक पोलिस निरीक्षक धीरज गवारे आणि त्यांच्या पथकाने तांत्रिक तपासाची चक्रे फिरवली.




बदलापूरहून राज्यभरात जाळे




संशयिताने नोकरीच्या शोधात असलेल्या सुशिक्षित बेरोजगार तरुणांना लक्ष्य केले. आघाडीच्या जॉब पोर्टल्सवर नामांकित कंपन्यांच्या नावाने आणि ‘इन्फोड्रीम्स’सारख्या बनावट कंपन्यांची नोंदणी करून जाहिराती दिल्या जात होत्या. या जाहिरातींना प्रतिसाद देणाऱ्या तरुणांशी फोनवर संपर्क साधून त्यांची ‘मुलाखत’ घेतल्याचा बनाव रचला जात होता. त्यानंतर तसेच नामांकित एअरलाइन्सच्या नावाने अधिकृत दिसणारी ऑफर लेटर्स, गेट पास आणि पोलिस व्हेरिफिकेशनची बनावट प्रमाणपत्रे तयार केली जात. ही कागदपत्रे इतकी हुबेहुब होती की अनेक तरुणांनी नोकरी निश्चित झाल्याचा विश्वास ठेवून पैसे भरले. वैद्यकीय तपासणी, सुरक्षा अनामत रक्कम, गणवेश, ओळखपत्र, कागदपत्र पडताळणी अशा विविध कारणांनी उमेदवारांकडून बँक खात्यांवर पैसे उकळले जात होते. एका उमेदवाराकडून काही हजारांपासून लाखो रुपयांपर्यंत रक्कम घेतली जात असल्याचा संशय आहे.



मजुरांच्या कागदपत्रांवर सिमकार्ड्स


नांदेड परिसरातील मजुरांच्या कागदपत्रांचा गैरवापर करून संशयिताने अनेक सीमकार्ड्स मिळवले होते. त्याचा वापर पीडित व्यक्तींशी संपर्क साधण्यासाठी करायचा. संशयिताकडून चार मोबाइल फोन, १२ सिमकार्ड्स, १२ डेबिट, क्रेडिट कार्ड आणि २ चेकबुक जप्त केले आहेत. विशेष म्हणजे, संशयित कधीही पीडितांना प्रत्यक्ष भेटत नव्हता. एका छोट्या तांत्रिक चुकीने तपासाला दिशा मिळाली आणि पोलिसांनी अटक केली.




फसवणुकीची पद्धत


-जॉब पोर्टलवर बनावट कंपन्यांच्या नावाने जाहिराती


-फोनवरच मुलाखतीचा बनाव


-'एआय'च्या मदतीने बनावट ऑफर लेटर, गेट पास


-वैद्यकीय तपासणी, गणवेश, आयडी कार्डच्या नावाने पैसे


-मजुरांच्या कागदपत्रांवर सिमकार्ड्सची खरेदी


-मोबाइल आणि बँक खात्यांतून व्यवहार

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.