म. टा. प्रतिनिधी, पुणे: पुणेकरांनी दिवाळीच्या खरेदीसाठी शनिवारी शहराच्या मध्यवर्ती बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी केल्याने आणि वाहतूक पोलिसांच्या नियोजनाच्या अभावामुळे मध्यवर्ती भागात वाहतुकीचा अक्षरशः बोजवारा उडाला. लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता आणि रविवार पेठ परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. त्यातच ‘नो एंट्री’तून होणारी वाहनांची घुसखोरी, रस्त्यांवरील दुहेरी पार्किंग आणि नो-पार्किंगमध्ये उभी केलेली वाहने यांमुळे कोंडीत भर पडली.




दिवाळी जवळ आल्याने कपडे, फराळाचे साहित्य, सजावटीच्या वस्तू आणि अन्य खरेदीसाठी नागरिकांनी शहरातील मध्यवर्ती बाजारपेठांकडे धाव घेतली. त्यामुळे पेठांमधील प्रमुख रस्त्यांवर वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. मात्र, वाढलेल्या गर्दीच्या तुलनेत वाहतुकीचे नियंत्रण प्रभावीपणे होत नसल्याचे चित्र दिसून आले. लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता आणि केळकर रस्त्यावर वाहतूक कोंडीची तीव्रता अधिक होती.




वाहतुकीसाठी निर्बंध असलेल्या मार्गांवरूनही वाहने जात असल्याने रस्त्यांवरील ताण वाढला. त्यातच दुहेरी पार्किंग आणि नो-पार्किंग क्षेत्रात उभ्या केलेल्या वाहनांमुळे वाहतुकीसाठी उपलब्ध असलेली जागा आणखी कमी झाली. परिणामी, बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी आलेल्या नागरिकांसह या मार्गांवरून जाणाऱ्या अन्य वाहनचालकांनाही कोंडीचा फटका बसला.




दिवाळीच्या काळात बाजारपेठांमध्ये गर्दी वाढणार, हे अपेक्षित असतानाही वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पुरेशी व्यवस्था दिसून आली नाही. मध्यवर्ती भागातील वाहतूक विभागात कर्मचारी रजेवर असल्याने वाहतूक नियंत्रणासाठी मनुष्यबळ कमी पडत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यास विलंब होत असल्याचे सांगण्यात आले.



शनिवार-रविवारी अवजड वाहनांना बंदी




दिवाळीच्या खरेदीसाठी मध्यवर्ती बाजारपेठांमध्ये होणारी गर्दी व वाहतूक कोंडी लक्षात घेता बाजीराव रस्ता, शिवाजी रस्ता या दोन रस्त्यांवर दर शनिवार-रविवारी अवजड वाहनांवर बंदी घालण्यात आली आहे. आजपासून (२५ ऑक्टोबर) दिवाळी संपेपर्यंत ही बंदी लागू असेल, असा आदेश वाहतूक पोलिस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी काढला आहे. ट्रक-टेम्पो, डंपर, सिमेंट मिक्सर, ट्रेलर व अन्य अवजड वाहनांवर ही बंदी असेल.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.