लखनौ : हत्या प्रकरणात दीड वर्ष गुंगारा देणाऱ्या आरोपीला उत्तर प्रदेशातील मऊ येथील पोलिसांनी अटक केली आहे. अटकेपासून वाचण्यासाठी त्याने खरं तर एखाद्या चित्रपटातील कथानकाला शोभेल असा डाव रचला होता. त्याने स्वतःच्या मृत्यूचं नाटक केलं. विशेष म्हणजे त्याने एआयचा वापर करुन चितेवर ठेवलेल्या बॉडीचा एक बनावट फोटोही तयार केला आणि एका बकऱ्यावर अंत्यसंस्कार केले. मात्र पोलिसांनी त्याचा डाव हाणून पाडला.




आरोपीने स्वतःचा मृत्यू आणि अंत्यसंस्कार झाल्याचे दर्शवणारी बनावट कागदपत्रे मिळवली आणि न्यायालयात मृत्यूचा दाखला सादर करुन वकिलांमार्फत तसा दावा केला. २५ ऑक्टोबर रोजी कोतवाली नगर पोलिसांनी स्पेशल ऑपरेशन्स ग्रुप आणि सर्व्हिलन्स टीमच्या मदतीने त्याला ख्वाजाहनपूर परिसरातून अटक केली.




पोलिसांच्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव राजू उर्फ ​​राजकुमार राजभर (वय ३८) असून तो मऊ येथील कोतवाली नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ख्वाजाहनपूरचा रहिवासी आहे. तो २०१६ मध्ये योगेश सिंग यांची गोळ्या झाडून हत्या केल्याप्रकरणातील आरोपी आहे. खटला सुरु असताना, त्याने कायदेशीर कारवाईतून वाचण्यासाठी स्वतःच्या मृत्यूची खोटी कथा रचली आणि न्यायालयात बनावट कागदपत्रे सादर केली होती.




२०१६ मध्ये योगेश सिंग यांची गोळ्या झाडून हत्याही घटना १९ डिसेंबर २०१६ ची आहे, जेव्हा मुन्शीपुरा रेल्वे मार्गाजवळ योगेश सिंग यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर, मृताचा पुतण्या अविनाश सिंग याच्या तक्रारीवरून कोतवाली नगर पोलीस ठाण्यात राजू आणि त्याचा साथीदार सुदर्शन राजभर यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनुसार, हा गुन्हा भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ अंतर्गत नोंदवण्यात आला होता आणि न्यायालयात कायदेशीर प्रक्रिया सुरू होती.




बॉडीचा फोटो तयार करण्यासाठी एआयचा वापरपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, "आरोपीने ३० मे २०२५ रोजी गाझीपूरमध्ये स्वतःचा मृत्यू झाल्याचे भासवण्यासाठी एक कट रचला होता. या योजनेचा भाग म्हणून, एका स्मशानभूमीत चितेवर मृतदेह ठेवल्याचे दर्शवणारा, 'एआय'द्वारे तयार केलेला फोटो वापरण्यात आला होता. तसेच, अंत्ययात्रा आणि अंत्यसंस्कारांचे बनावट फोटोही तयार करण्यात आले, जेणेकरुन त्याच्या मृत्यूची ही कथा खरी वाटावी.




त्यानंतर, मृत्यू प्रमाणपत्र आणि अंत्यसंस्काराचे प्रमाणपत्र यांसारखी विविध कागदपत्रे बनावट पद्धतीने तयार करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या कागदपत्रांचा वापर करून आरोपीने 'मऊ नगर परिषदे'कडून स्वतःचे एक खोटे मृत्यू प्रमाणपत्रही मिळवले. त्यानंतर स्वतःचा मृत्यू सिद्ध करण्यासाठी त्याने ही कागदपत्रे न्यायालयात सादर केली आणि स्वतः तो भूमिगत झाला. मात्र पोलिसांनी तपास करून या कटाचा पर्दाफाश केला आणि त्याला अटक केली.




गुंतवणुकीच्या नावाखाली पैसे उकळलेआरोपी शेअर बाजारातील व्यवहारांशी संबंधित होता आणि त्याने अनेक व्यक्तींकडून पैसे घेतल्याचाही आरोप आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षक अनुप कुमार यांच्या म्हणण्यानुसार, आरोपीने १२ वीची परीक्षाही उत्तीर्ण केलेली नाही, तो शेअर बाजारात व्यवहार करत असे. त्याने विविध शहरांतील अनेक प्रतिष्ठित व्यक्तींकडून शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून पैसे गोळा केले होते. कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी आणि लोकांकडून घेतलेले पैसे परत न द्यावे लागतील, या उद्देशाने त्याने स्वतःला मृत घोषित करण्याचा हा कट रचला होता.




खोट्या मृत्यू प्रमाणपत्राच्या संदर्भातही एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनुसार, स्वतःचा मृत्यू खोटा सिद्ध करण्यासाठी कागदपत्रे बनावट तयार केल्याप्रकरणी कोतवाली नगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.