पुणे: राजगड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील भोर तालुक्यातील वेळू येथील आमराई रिसॉर्ट लॉजिंगमध्ये देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याचे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत उघड झाले आहे. महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून देहविक्री करून घेतली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांच्या पथकाने बनावट ग्राहक पाठवून छापा टाकला. या वेळी १३ महिलांची सुटका करून घेण्यात आली.
या कारवाईत लॉजच्या काउंटरवर असलेला वैभव बालाजी इंगळे याच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली असून, लॉजचालक रघू शेट्टी आणि इंगळे यांच्याविरुद्ध राजगड पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
वेळू येथील आमराई रिसॉर्ट लॉजिंगमध्ये रघू शेट्टी हा महिलांना पैशांचे आमिष दाखवून देहविक्री करण्यास प्रवृत्त करत असल्याची माहिती पुणे ग्रामीण पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाच्या नोडल अधिकारी आणि पोलिस उपअधीक्षक स्नेहा गिरी यांना मिळाली होती. त्यानुसार कारवाईचे नियोजन करण्यात आले.
सापळा रचून केली कारवाई
कारवाईपूर्वी पोलिसांनी एका व्यक्तीला बनावट ग्राहक म्हणून तयार केले. त्याच्यासोबत दोन पंच घेण्यात आले. संबंधित ठिकाणी जाऊन माहितीची खात्री करण्यासाठी बनावट ग्राहकाला सूचना देण्यात आल्या. त्याला दोन ५०० रुपयांच्या नोटा देण्यात आल्या. लॉजमध्ये बनावट ग्राहकाला महिला उपलब्ध करून दिल्यानंतर त्याने ठरल्याप्रमाणे पोलिसांना मोबाइलवर मिस कॉल देऊन इशारा करण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार पोलिस पथक आणि दोन खासगी पंच घटनास्थळी पोहोचले. पथकाने पाहणी केली असता, देहविक्रीचा प्रकार उघड झाला.
तालुक्यात खेड-शिवापूर, वेळू परिसरात गेल्या काही काळापासून मोठ्या रिसॉर्टमध्ये सुरू असलेल्या गैरप्रकारांवर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. मात्र, स्थानिक राजगड पोलिसांना हा गैरप्रकार दिसला नाही, की त्यांनी सोयीस्कर काणाडोळा केला, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. असे प्रकार रोखले जावेत, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास राजगड पोलिसांकडून करण्यात येत आहे.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.