म. टा. प्रतिनिधी, पुणे: उद्योजक राणा सूर्यवंशी यांच्यावरील हल्ल्याच्या तपासात पिस्तूल नेमके आले कोठून, हा प्रश्न अनुत्तरित राहिला आहे. हल्ल्यानंतर बारामती पोलिसांना घटनास्थळी पिस्तूल; तसेच काडतुसाची पुंगळीदेखील सापडलेली नाही. अन्य एका व्यक्तीने स्थानिक पोलिसांना पिस्तूल दिले; तसेच हल्लेखोरांना सत्तूर आणि पैसे पुरविणाऱ्या आरोपीनेही पिस्तूल दिले नसल्याचे पोलिसांच्या चौकशीत सांगितले आहे. त्यामुळे हल्ल्यात खरेच पिस्तुलाचा वापर झाला का, ते हल्लेखोरांना कोणी दिले आणि ते घटनास्थळावरून कधी हटवले, असे प्रश्न उपस्थित झाले आहेत.
सूर्यवंशी यांच्यावर १८ ऑक्टोबरला सायंकाळी बारामतीत हल्ला झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत पाच आरोपींना अटक केली आहे. हल्ल्यानंतर घटनास्थळाची पाहणी करताना पोलिसांना पिस्तूल सापडले नव्हते. ते अन्य एका व्यक्तीने आणून दिल्याची माहिती ग्रामीणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली; तसेच ‘मेटल डिटेक्टर’चा वापर करून काडतुसाची पुंगळी शोधण्यात आली. मात्र, तीदेखील तेथे सापडली नाही.
... तरीही तपास अपूर्ण
या प्रकरणात पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली असून, आणखी दोन आरोपींच्या मागावर आहेत. याशिवाय, अन्य तिघांची नावेही निष्पन्न झाली आहेत. त्यामुळे कटात सहभागी असलेल्या व्यक्तींची साखळी शोधण्याच्या दृष्टीने तपास सुरू आहे. काही आरोपी पोलिसांच्या ताब्यात आले असले, तरीही पोलिसांना प्रकरणाच्या मुळाशी अद्याप जाता आलेले नाही.
साळुंखेच्या अटकेनंतर होईल उलगडा?
राणा सूर्यवंशी यांच्यावरील हल्ल्याच्या तपासात सुपारीच्या पैशांची साखळी समोर आली आहे. हल्लेखोर अल्पवयीन मुलगा आणि पार्थ अवथळे यांना ज्ञानदेव शिंदे याने सुपारी दिली होती. शिंदे याला स्वप्नील कांबळे आणि निनाद महाडिक यांनी हल्ला करण्यास सांगून पैसे दिले होते. मात्र, कांबळे आणि महाडिक यांना हे पैसे ज्ञानेश्वर साळुंखे आणि चैतन्य बाबर यांच्या सांगण्यावरून देण्यात आल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. चैतन्य बाबर याला पोलिसांनी अटक केली असून, या प्रकरणातील महत्त्वाची माहिती साळुंखे याच्याकडून मिळण्याची शक्यता आहे.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.